जीवनावश्यक वस्तुंच्या दुकानांना ७ ते ११ वाजेपर्यंत सूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 11:52 AM2021-05-20T11:52:48+5:302021-05-20T11:53:35+5:30
Buldhana News : २० मे च्या सकाळी ६ वाजेपासून १ जूनच्या सकाळी ७ वाजेपर्यंत आनुषंगिक निर्बंध कायम राहतील.
बुलडाणा : कोरोना संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी जिल्ह्यात १० मेपासून लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सूट देण्यात आली आहे. यासोबतच खरिपाचा हंगाम तोंडावर आल्याच्या पार्श्वभूमीवर कृषीशी संबंधित बाबींनाही या निर्बंधांतून सकाळी ९ ते दुपारी ४ या कालावधीत सूट देण्यात आली आहे, असे असले तरी उपरोक्त कालावधीव्यतिरिक्त अत्यावश्यक आणि वैद्यकीय कारणांशिवाय कोणासही घराबाहेर पडण्यास बंदी राहणार असल्याचे जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी आनुषंगिक आदेशात स्पष्ट केले आहे. २० मे च्या सकाळी ६ वाजेपासून १ जूनच्या सकाळी ७ वाजेपर्यंत आनुषंगिक निर्बंध कायम राहतील.
कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या २३ मेपर्यंत बंद राहणार आहेत. त्यानंतर टोकन पद्धतीने नियोजनाची जबाबदारी जिल्हा उपनिबंधकांवर राहील.
वकिलांची कार्यालये राहणार सुरू
वकिलांची कार्यालये, तसेच चार्टर्ड अकाउंटंटची कार्यालये सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. याव्यतिरिक्त सराफा व्यावसायिकांसाठीही दुकान उघडून तपासणी करण्याकरिता गुरुवारी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.
सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत ही दुकाने राहणार सुरू
किराणा, औषधी, स्वस्त धान्य दुकानांसह इतर सर्व प्रकारची जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, भाजीपाला व फळविक्रीची दुकाने, दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री, सर्व प्रकारच्या खाद्याची दुकाने, उद्योगगृहे, पाळीव प्राणी, खाद्य पदार्थांची दुकाने, पावसाळी हंगाम सामग्रीची दुकाने, पेट्रोल पंप, डिझेल व सीएनजी या कालावधीत सुरू राहतील.
बँका दुपारी १ वाजेपर्यंत सुरू राहणार
जिल्ह्यातील बँका या सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील. येथे शेतकरी व ग्राहकांची गर्दी होण्याची शक्यता पाहता बँकेच्या ठिकाणी आवश्यक तो पोलीस बंदोबस्त पुरविण्याची पोलीस प्रशासनाची जबाबदारी राहील. कोरोना प्रतिबंधांच्या त्रिसूत्रीचे पालन करणे आवश्यक राहील. पतसंस्था, वित्तीय संस्था, विमा, पोस्ट पेमेंट बँक व आर्थिक बाबींशी संबंधित सर्व वित्तीय संस्था या कालावधीत सुरू राहतील.
शेतकऱ्यांसाठी रात्री ८ वाजेपर्यंत पेट्रोलपंप सुरू
निर्बंधाच्या कालावधीत शासकीय मालवाहतूक, रुग्णवाहिका इत्यादी अत्यावश्यक वाहनांसोबत शेतातील कामे व मालाची वाहतूक करण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांकरिता सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत पेट्रोल पंप सुरू राहणार आहेत. कृषी संबंधीत दुकाने सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपयर्यंत सुरू राहणार आहेत.
भोजनालय, उपाहारगृहातून ‘होम डिलिव्हरी’
निर्बंधांच्या कालावधीत जिल्ह्यात रेस्टॉरंट, भोजनालये व उपाहारगृहांना सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत या कालावधीत केवळ होम डिलिव्हरीद्वारे सेवा देण्यास परवानगी राहणार आहे.