पुरग्रस्त गावात पुरनियंत्रण समित्या स्थापन करा- पियुष सिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:33 AM2021-05-24T04:33:11+5:302021-05-24T04:33:11+5:30
बुलडाणा : मान्सून तोंडावर आला असून, बुलडाणा जिल्ह्यातील संभाव्य पूरग्रस्त २६७ गावांमध्ये पूरनियंत्रण समित्या स्थापन करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त ...
बुलडाणा : मान्सून तोंडावर आला असून, बुलडाणा जिल्ह्यातील संभाव्य पूरग्रस्त २६७ गावांमध्ये पूरनियंत्रण समित्या स्थापन करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी दिले आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, एसडीओ आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेत अनुषंगिक निर्देश दिले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात २६७ गावे ही संभाव्य पूरग्रस्त गावे आहेत. पैकी ८६ गावे ही अतिप्रवण क्षेत्रात येतात. अशा गावांमध्ये प्रामुख्याने पूरनियंत्रण समित्या स्थापन करण्याबाबत त्यांनी निर्देशित केले आहे. सोबतच जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा आणखी अद्ययावत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सोबतच गावपातळीवर पूरनियंत्रण समित्या नियुक्त करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांना नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त केले आहे.
दुसरीकडे उपलब्ध साहित्य सुस्थितीत आहे किंवा नाही, याची पडताळणी करण्यासोबतच पूर येणाऱ्या नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्याबाबतच्या कार्यपद्धतीची उजळणी करण्याचेही निर्देश दिले आहेत.
--अतिक्रमण हटविण्याच्या सूचना--
जिल्ह्यात ग्रामीण तथा शहरी भागात नदीकाठावर तसेच नदीपात्रामध्येही काही कुटुंबे अतिक्रमण करून राहत आहेत. त्यांचे अतिक्रमणही हटविण्याबाबत विभागीय आयुक्तांनी सूचना दिल्या आहेत. अशी कुटुंबे अतिवृष्टी किंवा पुरामुळे बाधित झाल्यास त्यांना शासनाकडून मदत मिळण्यात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे याबाबत त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचनाही जिल्हा प्रशासनास विभागीय आयुक्तांनी दिल्या आहेत.
--वीज अटकाव यंत्रांची दुरुस्ती--
बुलडाणा जिल्ह्यात प्रामुख्याने किनगाव राजा, कोलारा, घारोड , बावनबीर या चार ठिकाणी वीज अटकाव यंत्र लावण्यात आले आहे. प्रामुख्याने या भागात वीज पडण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे येथील वीज अटकाव यंत्रणा सुस्थितीत आहे किंवा नाही,, याचीही पाहणी करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या आहेत.
--जीर्ण इमारतींबाबत दक्षता--
पावसाळ्यात जीर्ण इमारती पडून जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता असते. ते पाहता, शहर तथा ग्रामीण भागातील अशा जीर्ण इमारतींची पाहणी अभियंत्यांमार्फत करण्यात येऊन पावसाळ्यात या इमारती राहण्यायोग्य आहेत किंवा नाही, याची खात्रीही करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.