संचालकांविरुद्ध चौकशीसाठी समिती स्थापन
By admin | Published: July 10, 2017 01:09 AM2017-07-10T01:09:47+5:302017-07-10T01:09:47+5:30
टोकन वाटप गैरप्रकार व सेस कमी केल्याचे प्रकरण : जिल्हा उपनिबंधकांचा आदेश
शेगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती आणि इतर नऊ संचालकांनी शासनाच्यावतीने करण्यात आलेल्या तूर खरेदीमधील टोकन वाटपांमध्ये केलेल्या गैरप्रकार आणि बाजार समितीत येणाऱ्या कापसावरील सेस कमी केल्याच्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम १९६३ चे कलम ४० (ब) अन्वये जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, बुलडाणा यांनी सदर प्रकरणाच्या चौकशीचा आदेश पारित केला आहे. यासाठी द्विसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
शेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोकन वाटपामधील भ्रष्टाचार आणि कापसावरील सेस कमी केल्याच्या प्रकरणामध्ये चिंचोली येथील शिवशंकर शालीग्राम गीते यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, बुलडाणा यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. यामध्ये सभापती गोविंद मिरगे व इतर नऊ संचालकांविरुद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. ह्या प्रकरणात जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी ३ जुलै रोजी आदेश करीत, या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये एस.पी. पोहरे सहायक निबंधक सहकारी संस्था, शेगाव आणि व्ही. डी. अभंग तालुका लेखा परीक्षक, सहकारी संस्था, शेगाव या द्वि सदस्यीय समितीची नियुक्ती केली असून, या समितीला १५ दिवसांच्या आत सदर प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचा आदेश देण्यात आला आहे. चौकशी समितीसमोर दोन मुद्यांवर चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला असून, यामध्ये सर्वसाधारण सभा ४ मार्च १७ मधील विषय क्र. १७ मधील बाजार समितीचे कापसावरील सेस हा १.५ रुपये दरावरून ५० पैसे इतका कमी करून बाजार समितीचे २० लाख रुपयांचे नुकसान करणे आणि तूर खरेदी केंद्रावर बाजार समितीचे संचालक मंडळाने व्यापाऱ्यांशी संगनमत करून व आर्थिक गैरव्यवहार करून व्यापाऱ्यांनी त्यांचा माल शासकीय तूर खरेदी केंद्रावर विकला. टोकन देताना व्यापाऱ्यांनी तो जवळच्या नातेवाईकांना सत्ताधारी असल्याचा गैरफायदा घेऊन समितीचे कर्मचारी यांच्यावर अनुचित पद्धतीने दबाव निर्माण करून, संचालकांनी अधिकारांचा गैरवापर करून, नियमबाह्यपणे टोकन वाटप करण्यास भाग पाडणे, या मुद्यांचा समावेश आहे.
चौकशीमधून दोघांना वगळले!
बाजार समितीचे संचालक श्रीधर पांडुरंग पाटील व नीलेश प्रेमकुमार राठी या दोन संचालकांविरुद्ध सहायक निबंधक सहकारी संस्था, शेगाव यांनी चौकशी पूर्ण करून त्यांचेविरुद्ध स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर केलेला आहे. त्यामुळे हे दोन संचालक वगळून चौकशी करण्यात यावी, असे आदेशात नमूद करण्यात आलेले आहे.