कोविडमुळे पालकत्व गमावलेल्या मुलांसाठी जिल्हास्तरीय कृतिदलाची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:36 AM2021-05-21T04:36:38+5:302021-05-21T04:36:38+5:30
याबाबत टास्क फोर्सची गुगल मीटच्या माध्यमातून १९ मे रोजी ऑनलाईन बैठक घेण्यात आली. बैठक जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या ...
याबाबत टास्क फोर्सची गुगल मीटच्या माध्यमातून १९ मे रोजी ऑनलाईन बैठक घेण्यात आली. बैठक जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अशोक मारवाडी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे व पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आईवडिलांचे छत्र गमावलेल्या बालकांचा व ज्यांचे आई वडील किंवा पालक कोरोना या आजाराच्या संक्रमणामुळे रुग्णालयात दाखल असून निवारा आणि मदतीची अत्यावश्यक गरज आहे अशा बालकांचा शोध घेण्याचे आदेश यावेळी देण्यात आले जिल्ह्यात अशा बालकांसाठी शून्य ते सहा या वयोगटासाठी शिशुगृह, सहा ते १८ वर्ष वयोगटासाठी बालगृह निश्चित करण्याचे आदेश जिल्हा महिला व बाल विकास विभागाला जिल्हाधिकारी यांनी दिले. संकटात सापडलेल्या अशा बालकांची माहिती चाईल्ड हेल्प लाईन १०९८ वर देण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी यांनी केले.
तसेच बालकांच्या संविधानिक व बाल हक्कांच्या संरक्षणासाठी कृतिदलामार्फत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व पोलीस विभाग यांना सूचित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील रुग्णालये, खाजगी दवाखाने तसेच कोविड सेंटर येथे महिला व बाल विकास विभागाचे मदत क्रमांक दर्शनी भागात प्रदर्शित करण्याचे आवाहन या कृतिदलामार्फत करण्यात आले आहे. दोन्ही पालक मृत्यू पावलेले व ज्यांना अत्यावश्यक निवाऱ्याची गरज आहे, अशा बालकांची माहिती तात्काळ नजीकच्या जिल्हा बाल कल्याण समितीला व चाईल्ड लाईन टोल फ्री १०९८ क्रमांकावर द्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.