३६ तासानंतरही धानोरा येथील महिको कंपनीतून बियाणे नमुने घेणे सुरूच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 02:10 AM2017-12-11T02:10:35+5:302017-12-11T02:12:39+5:30
नांदुरा: महिको कंपनीच्या धानोरा येथील प्रक्रिया व पॅकिंग युनिटवर शुक्रवार ८ डिसेंबरच्या रात्री पोलिसांनी टाकलेल्या अचानक छाप्यानंतर येथील बीटी कपाशी बियाणे असलेले सर्व गोडावून सील करण्यात आले होते. तीन दिवस झाले तरी अजूनही कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांच्या उपस्थितीत बियाण्यांचे नमुने तपासण्याचे काम रविवारीसुद्धा दिवसभर सुरूच होते.
लोकमत न्यूज नेटवर्क

चालू हंगामात राज्यातील जवळपास सर्वच शेतकर्यांचे बीटी कपाशीवरील बोंडअळीने मोठे नुकसान झाले असून, बोंडअळीला प्रतिकारक्षम असणार्या कपाशीवर आलेल्या बोंडअळ्यांमुळे शेतकर्यांना बियाणे कंपन्यांनी बीटी बियाणेच पुरविले की बीटी बियाण्यांच्या नावाखाली बिगर बीटी बियाणे पुरविले अशी शंका शेतकरी वर्गात उपस्थित होत होती. याच पृष्ठभूमीवर दाखल झालेल्या तक्रारीनंतर महिको कंपनीवर अतिशय गुप्तता राखत शुक्रवारी रात्री अति.पो.अ. संदीप डोईफोडे व श्याम घुगे यांच्या पथकाने धाड टाकून बीटी बियाण्यांचे सर्व गोडावून सील केले होते.
शनिवारी सकाळपासून कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांच्या उपस्थितीत ६ बियाणे निरीक्षक कंपनीमधील सर्व बीटी बियाण्यांच्या लॉटचे नमुने तपासणीकरिता गोळा करीत आहेत. शनिवारी रात्री १२ पर्यंत नमुने गोळा केल्यानंतर पुन्हा गोडावून सील करून अधिकारी मलकापूर येथे मुक्कामाला गेले. यानंतर पोलिसांनी पहारा दिला. शनिवारी सकाळी १0 वाजेपासून पुन्हा नमुने गोळा करण्याचे कामास सुरुवात झाली असून, संध्याकाळपर्यंत केवळ एक ते दोन गोडावूनमधीलच नमुने गोळा झाले. कारवाईमुळे परिसरात शुकशुकाट ह७ोता.
पोलीस व कृषी विभागाचे संयुक्त पथक यामध्ये सहभागी असून, सहा बियाणे निरीक्षक बियाण्यांचे नमुने गोळा करीत आहेत. आणखी दोन ते तीन दिवस नमुने गोळा करण्यास वेळ लावण्याची शक्यता आहे.
- सुभाष नागरे
कृषी सहसंचालक, अमरावती