अतिक्रमण हटविल्यावरही वाहतुकीची कोंडी कायम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 03:23 PM2020-01-04T15:23:49+5:302020-01-04T15:23:57+5:30
रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला असला तरी खासगी प्रवासी वाहतुक करणारी वाहने या मोकळ्या जागेत उभी केल्या जात असल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : नगरपालिकेच्या वतीने शहरातील अतिक्रमण काढण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. दररोज टप्प्याटप्प्याने शहरातील अतिक्रमणावर जेसीबी चालविण्यात येत आहे. मात्र अतिक्रमण काढलेल्या जागेवर खासगी प्रवासी वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीची कोंडी कायम आहे.
बुलडाणा शहरात रस्त्याच्या दुतर्फा छोट्या व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली होती. पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने हे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत चालले होते. टीनशेड उभारून पक्की दुकाने बनविण्यापर्यंत या व्यावसायिकांची मजल गेली होती. स्वत:चीच जागा असल्याच्या आविर्भावात ही मंडळी वावरताना दिसत होती. एवढेच नव्हे तर अतिक्रमित जागा खरेदी-विक्रीचे व्यवहारदेखील सुरू होते. या खरेदी-विक्रीच्या माध्यमातून मोठी उलाढाल शहरात होत असल्याची माहिती मध्यंतरी कानावर पडत होती. या सर्व प्रक्रियेत रस्ते मात्र अरुंद झाल्याने सतत वाहतुकीची कोंडी निर्माण होत होती. यामुळे वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत होता. यासंदर्भात लोकमतने १ डिसेंबरच्या अंकात ‘बुलडाणा शहराला अतिक्रमणाचा वेढा’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित करून पालिकेचे लक्ष वेधले होते. यानंतर ५ डिसेंबर पासून पालिकेने अतिक्रमण हटाओ मोहिमेला सुरूवात केली होती. मात्र काही नेमक्याच अतिक्रमणावर कारवाई करून ही मोहिम थंडबस्त्यात पडली होती. मात्र यानंतर २७ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत शहरातील वाहतुक कोंडीचा प्रश्न समोर आला. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी पालिकेला शहरातील अतिक्रमण काढण्यासंदर्भात निर्देश दिले. यानुसार पालिकेने २८ डिसेंबर पासून अतिक्रमण हटाओ मोहिमेस सुरूवात केली आहे. याअंतर्गत शहरात टप्प्याटप्प्याने ही मोहिम राबविण्यात येत आहे. यामुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला असला तरी खासगी प्रवासी वाहतुक करणारी वाहने या मोकळ्या जागेत उभी केल्या जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी कायम असून अजुनही वाहनधारक त्रस्त आहेत. पोलिस प्रशासनानेदेखील मोकळ्या जागेवर प्रवासी वाहने उभी राहणार नाहीत, याकडे कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)