एक कोटी खर्चले तरी जनुना तलाव बगीचा भकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 03:55 PM2019-02-13T15:55:08+5:302019-02-13T15:55:46+5:30
खामगाव: जनुना तलाव परिसरातील सार्वजनिक बगिचावर १ कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला. तरीसुद्धा आजरोजी या बगिचाची दुर्दशा झाली असल्याचे वास्तव ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले.
- योगेश फरपट
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: जनुना तलाव परिसरातील सार्वजनिक बगिचावर १ कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला. तरीसुद्धा आजरोजी या बगिचाची दुर्दशा झाली असल्याचे वास्तव ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले.
खामगाव शहरापासून अवघ्या दोन किलोमिटर अंतरावर जनुना तलाव आहे. गेल्या दीडशे वर्षापूर्वी तलावाची निर्मिती करण्यात आली होती. निसर्गर्म्य वातावरण असल्याने याठिकाणी बगिचा तयार करण्यात आला. आबाल वृध्दांच्या पसंतीचे ठिकाण तलाव बनला. त्यामुळे तत्कालीन नगराध्यक्ष शंकरराव बोबडे यांनी विस्तारीकरणासाठी पुढाकार घेतला. त्याठिकाणी बालकांची करमणूक व्हावी म्हणून काही प्राणी, पक्षी ठेवण्यात आले. ज्यामुळे तलाव बगिचाचे आकर्षण वाढू लागले. मोठ्या प्रमाणात याठिकाणी पर्यटक येवू लागले. हा तलाव एक पर्यटन स्थळ म्हणून समोर आल्यानंतर याठिकाणी सर्व सुविधायुक्त प्रशस्त अशा सार्वजनिक बगिचाच्या विस्तारीकरणासाठी व सौंदर्यीकरणासाठी सुमारे १ कोटी रुपये २०१४ मध्ये उपलब्ध करून देण्यात आले. बगिचाचे उद्घाटन झाल्यानंतर काही प्रमाणात कामही झाले. मात्र प्रस्तावित आराखड्यानुसार काम पुर्ण होवू शकले नाही. मध्येच ते रखडले. त्यानंतरच्या काळात व सध्या सत्तेत असलेल्या सत्ताधाऱ्यांनी पुर्णपणे
बगिचाच्या सौंदर्यीकरणाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. त्यामुळे निधीतून कोणता विकास पालिका प्रशासनाने केला याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
निगा न राखल्याने वास्तू तुटून पडल्या
बगिचामध्ये लाखो रुपये खर्चून सांबर, हरिण, ससे, मोर, हत्ती अशा प्राण्यांची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. त्यामुळे बगिचाच्या सौंदर्यात भर पडली होती. कालांतराने त्याची निगा न राखल्याने ह्या प्रतिकृती तूटून पडल्या आहेत. तर ससे ठेवण्यासाठी केलेले पिंजरा घर फक्त नावालाच उरले आहे. त्यातील ससे गायब झालेले दिसून येतात.