पावसाचे दोन महिने लोटले, तरी १८ गावांची तहान अधिग्रहीत विहिरींवर
By ब्रह्मानंद जाधव | Published: August 10, 2023 05:05 PM2023-08-10T17:05:52+5:302023-08-10T17:06:04+5:30
उन्हाळ्यात तालुक्यातील ३६ गावांत पाणीटंचाई निवारणार्थ पंचायत समितीने वेळीच उपाययोजना करत विहिरींचे अधिग्रहण केले होते.
चिखली : पावसाळ्यातील दोन महिने उलटूनही पुरेसा पाऊस झालेला नसल्याने तालुक्यातील १८ गावांत उन्हाळा लागल्यापासून उद्भवलेली पाणी टंचाईची झळ अद्यापही कमी झालेली नाही. प्रशासनाने या गावातील पाणीटंचाई निवारणार्थ उन्हाळ्यात अधिग्रहीत केलेल्या विहिरी अद्यापही कायम ठेवलेल्या आहेत. परिणामी १८ गावांतील नागरिकांना पावसाळ्यातही अधिग्रहण केलेल्या विहिरींवरूनच तहान भागवावी लागत आहे.
तालुक्यात यंदा पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. आतापर्यंत सरासरी ४५० मी.मी. पावसाची नोंद होणे अपेक्षित होते. मात्र आजवर केवळ २७१.७ मी.मी. पावसाची नोंद झालेली आहे. अद्याप कुठेही सार्वत्रिक व दमदार स्वरूपाचा पाऊस झालेला नसल्याने अनेक गावात पावसाळ्यातही पाणीटंचाई कायम आहे. यापृष्ठभूमीवर पंचायत समिती प्रशासनास पाणीटंचाई निवारणार्थ पावसाळ्याच्या दिवसातही विहीर अधिग्रहण कायम ठेवण्याची वेळ आली आहे. आजरोजी तालुक्यातील १८ गावात फेब्रुवारी ते मे महिन्यादरम्यान पाणीटंचाई निवारणार्थ केलेल्या उपाययोजनाअंतर्गत अधिग्रहीत विहिर अद्यापही कायम आहेत. याच विहिरींवरून गावांची तहान भागविली जात असल्याने दमदार पावसाची गरज आहे. नसता पाणीटंचाईची दाहकता वाढण्याचे चित्र आहे.
३६ गावांसाठी झाले होते विहिरींचे अधिग्रहण
गत उन्हाळ्यात तालुक्यातील ३६ गावांत पाणीटंचाई निवारणार्थ पंचायत समितीने वेळीच उपाययोजना करत विहिरींचे अधिग्रहण केले होते. दरम्यान, पावसाळा लागल्यानंतर अल्पशा पावसानेही १८ गावांना दिलासा मिळाला आहे. ३६ पैकी १८ गावांमध्ये अधिग्रहीत विहिरींवरून पाणीपुरवठा बंद झालेला आहे. १८ गावांमध्ये आजही अधिग्रहीत विहिरींवरूनच पाणीपुरवठा सुरू आहे.
पाणीटंचाई असलेली गावे
तालुक्यातील बोरगाव वसु, आमखेड, हातणी, बोरगाव काकडे, पेठ, वळती, खोर, सवणा, डासाळा, अमोना, सोमठाणा, खैरव, कोनड खु., बेराळा, धोत्रा भनगोजी, रोहडा, पेठ आणि गांगलगाव या गावांचा पाणीपुरवठा अधिग्रहीत विहिरींवर अवलंबून आहे.