गंभीर रुग्णही गृहविलगीकरणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:35 AM2021-04-22T04:35:39+5:302021-04-22T04:35:39+5:30
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णालयांमधील खाटा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे लक्षणे नसलेले व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना ...
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णालयांमधील खाटा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे
लक्षणे नसलेले व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना घरातच उपचार घेण्यास सांगण्यात येत आहे. याआधी होम क्वारंटाइन कालावधी १४ दिवसांचा होता. आता हा कालावधी १७ दिवसांचा करण्यात आला आहे. मात्र, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे व खाटा मिळण्यास काहीवेळा विलंब होत असल्याने रुग्णांना घरातच उपचार घेण्यास सांगण्यात येते. नियमित औषध व खबरदारी न घेतल्यामुळे काही रुग्ण गंभीर होण्याचे प्रकारही वाढले आहेत. जिल्ह्यात खाटांची संख्या टप्याटप्याने वाढवणे सुरू ठेवले आहे. मात्र, अतिदक्षता विभागातील खाटा आणि व्हेंटिलेटरवर खाटांची कमतरता भासत आहे. सर्वसामान्य व गरीब रुग्णांना खाटा न मिळाल्यास घरातच उपचार घ्यावे लागत आहेत. उपचार न घेतल्यास त्यांची प्रकृती खालावण्याचा धोका असतो.
एकूण रुग्ण - ५४८२१
बरे झालेले रुग्ण - ४७१४२
सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण - ७३२६
होम क्वारंटाइनमध्ये सर्वाधिक रुग्ण
मार्च २०२० पासून आतापर्यंत जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण हे होम क्वारंटाइन राहिलेले आहेत. सध्या जिल्ह्यात ६ हजार ३२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील काही रुग्ण हे होम क्वारंटाइन आहेत. डिसेंबरपर्यंत होम क्वारंटाइन रुग्णांचे प्रमाण कमी होते. मात्र, मार्चपासून ही संख्या आता वाढली आहे.
गृहविलगीकरणाची कारणे काय?
कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आल्यानंतर बहुतांश कोविड केंद्रे बंद करण्यात आली होती. मात्र, दुसऱ्या लाटेत कोरोनाचे रुग्ण वाढत गेले. त्या तुलनेत खाटा कमी पडू लागल्या. त्यातच लक्षणे नसलेले व सौम्य लक्षणे असलेले रुग्ण खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल होऊ लागल्याने गंभीर रुग्णांना खाटा मिळेना झाल्या. त्यामुळे रुग्णालयात दाखल करून घेण्याची गरज असलेल्या बाधित रुग्णांना खाटा दिल्या जात आहेत. त्यामुळे बहुतांश रुग्णांना घरातच उपचार घ्यावे लागत आहेत.
असे आहेत नियम...
रुग्ण बाधित झाल्यापासून दहा दिवस गृहविलगीकरणात राहिल्यानंतर त्यांना वैद्यकीय अधिकारी पथकाच्या सल्ल्यानेच डिस्चार्ज मिळाल्याचे मानण्यात येईल. संबंधित रुग्णाने त्यांच्या विभागाच्या वैद्यकीय अधिकारी (आरोग्य)
पथकाकडे दहा दिवस पूर्ण झाल्यावर प्रकृतीबाबत अद्ययावत माहिती देणे आवश्यक आहे. त्यानंतर त्याने इतर सर्व
रुग्णांप्रमाणेच पुढील सात दिवस गृहविलगीकरण पाळणे आवश्यक आहे. मात्र, यापैकी किती रुग्ण मृत्यू पावले याची आकडेवारी उपलब्ध झाली नाही.