कोरोनाच्या काळातही शेतकरी उत्पादक कंपन्या तग धरून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:35 AM2021-05-19T04:35:49+5:302021-05-19T04:35:49+5:30
बुलडाणा : कोरोना आपत्तीच्या काळात अनेक उद्योग, व्यवसाय बंद पडले; परंतु या कठीणप्रसंगी शेतकऱ्यांच्या मेहनतीने शेतकरी उत्पादक कंपन्या तग ...
बुलडाणा : कोरोना आपत्तीच्या काळात अनेक उद्योग, व्यवसाय बंद पडले; परंतु या कठीणप्रसंगी शेतकऱ्यांच्या मेहनतीने शेतकरी उत्पादक कंपन्या तग धरून आहेत. राज्यात सध्या ३ हजार २८३ शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत. त्यातील अनेक नवीन कंपन्यांची नोंदणी ही मार्च २०२० नंतर म्हणजे लॉकडाऊनच्या काळात झालेली आहे. त्यामुळे शेतकरी आणि शेती व्यवसायानेही आता काळाची पावले ओळखून तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्याचे आशादायी चित्र आहे. कोरोना काळात सर्वांचीच घडी विस्कटली आहे; परंतु राज्यभर कार्यरत असलेल्या हजारो शेतकरी उत्पादक कंपन्यांनी न डगमगता आपले कामकाज सुरळीत ठेवले आहे. खरेदी, बाजारभार, अनुदान याबाबतचे काही शासकीय धोरणे, अटी शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी अनुकूल नाहीत. मात्र, कंपन्यांनी त्या मुद्यांकडे दुर्लक्ष करून आपले कार्य सुरू ठेवलेले आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम आज समोर येत आहेत. मार्च २०२० पासून आतापर्यंत राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रापुढे शेतकरी उत्पादक कंपन्यांनी एक मोठे आव्हान उभे केले आहे.
१० हजार कंपन्यांचे उद्दिष्ट
राज्यात १० हजार कंपन्या स्थापन करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. त्यानुषंगाने हालचाली सुरू आहेत. नाबार्डच्या विशेष योजनेच्या व्यतिरिक्तदेखील अन्न प्रक्रिया मंत्रालयाच्या ज्या योजना आहेत, त्यांचा लाभही या कंपन्यांना मिळू शकतो.
अमरावती विभागात सर्वाधिक कंपन्या बुलडाण्यात
अमरावती विभागातून सर्वाधिक शेतकरी उत्पादक कंपन्यांची संख्या बुलडाणा जिल्ह्यात आहे. बुलडाणा जिल्ह्यामध्ये ११५ कंपन्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. कमीत कमी १० किंवा त्यापेक्षा अधिक शेतकरी ज्यांची वास्तविक शेती आहे किंवा २ आणि त्यापेक्षा जास्त संस्था ज्या वास्तविक शेती उत्पादन करतात, असे शेती उत्पादक कंपनी स्थापन करू शकतात.
शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून अनेक शेतकरी आपले उत्पादन वाढवत आहेत. शेतकरी उत्पादक कंपनी ही संकल्पना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. जिल्ह्यातून त्याचे सकारात्मक परिणामच समोर येत आहेत.
-नरेंद्र नाईक, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, बुलडाणा.
इतर कंपन्याप्रमाणेच शेतकरी उत्पादक कंपन्यांनाही भागभांडवल उपलब्ध करून दिले पाहिजे. कंपन्यांना योग्य वेळी कर्ज उपलब्ध करून दिल्यास त्यांना आपली प्रगती साधता येईल. कंपनीला नाफेडचे खरेदी केंद्र मिळाले होते; परंतु ते पुन्हा बंद झाले. तरीसुद्धा कठीण काळात कंपन्या सुरू आहेत.
-प्रदीप देशमुख, प्रतिनिधी,
शेतकरी उत्पादक कपंनी, डोणगाव, ता. मेहकर.
अमरावती विभागातील शेतकरी उत्पादक कंपन्यांची संख्या
बुलडाणा ११५
अकोला ५६
वाशिम ५५
अमरावती ११३
यवतमाळ ७६