मुक्त शिक्षणाचा असाही गैरफायदा: परवागनी नसतानाही एकाच विद्यापीठातून दोन पदव्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 03:15 PM2018-09-03T15:15:28+5:302018-09-03T15:17:14+5:30
परवागनी नसतानाही विद्यार्थी एकाच विद्यापीठाच्या अथवा दोन विद्यापीठाच्या दोन पदव्या घेवून मुक्त शिक्षणाचा असाही गैरफायदा घेत असल्याचे चित्र आहे.
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: विद्यार्थ्यांना एकाच विद्यापीठातून किंवा दोन विद्यापीठाच्या एकाचवेळी दोन पदव्या अथवा पदव्यूत्तर पदव्या घेता येत नसल्याचा नियम यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये आहे. मात्र परवागनी नसतानाही विद्यार्थी एकाच विद्यापीठाच्या अथवा दोन विद्यापीठाच्या दोन पदव्या घेवून मुक्त शिक्षणाचा असाही गैरफायदा घेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे इतर ठिकाणी प्रवेश नसल्याचे विद्यार्थ्यांकडून घेतले जाणारे हमीपत्र नावालाच राहत आहे.
नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्याची कार्यपद्धती ठरविलेली आहे. अत्यल्प शिक्षण शुल्कात दर्जेदार शिक्षण देण्यावर सुरुवातीपासूनच भर दिला आहे. विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या माध्यमातून हव्या त्या ठिकाणाहून प्रवेश आणि परीक्षा पद्धतीमुळे वेळेची आणि पैशाची बचत होऊ शकते. मात्र आॅनलाइन प्रवेशापासून एकच विद्यार्थी एकाच वेळेस दोन पदव्या किंवा पदव्यूत्तर पदव्या घेत असल्याचे प्रकार वाढत आहेत. युजीसीच्या नियमान्वये एकाच विद्यार्थ्यास एकाच विद्यापीठाच्या अथवा दोन विद्यापीठाच्या स्वतंत्र दोन पदव्या अथवा पदव्युत्तर पदव्या घेता येत नाही. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेसाठी आॅनलाइन अर्ज करताना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर स्पष्ट नमुद करण्यात आलेला आहे. मात्र तरीसुद्धा या नियमाची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. आॅनलाइन प्रवेश घेताना विद्यार्थ्यांकडून ‘‘प्रवेश घेऊ इच्छित असलेल्या पदवी व्यतिरिक्त या अथवा कोणत्याही विद्यापीठात पदवी अथवा पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेतलेला नाही; असा प्रवेश घेतलेला असल्यास माझा प्रवेश रद्द होईल आणि मी एका विद्यापीठाची पदवी अथवा पदव्युत्तर पदवी परत करील.’’ असे हमीपत्र घेतल्या जाते. मात्र तरीसुद्धा एकाच वेळी एक किंवा दोन विद्यापीठातून दोन पदव्या किंवा पदव्युत्तर पदवी घेणारे अनेक विद्यार्थी आढळून येतात. याची कुठेच तपासणी किंवा पडताळणी होत नसल्याने विद्यार्थी सुद्धा मुक्त शिक्षणाचा गैरफायदा घेण्यास मागे पुढे पाहत नसल्याचे दिसून येते.
विद्यार्थ्यांना मतदार यादीत नावाची अट
शैक्षणिक सत्र २०१८-१९ मध्ये प्रवेश घेणाºया सर्व विद्यार्थ्यांना मतदार नाव नोंदणी यादीमध्ये नाव समाविष्ट करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांने हमीपत्र भरणे आवश्यक केले आहे. त्यामध्ये विद्यार्थी १८ वर्षाचा नसेल तर १८ वर्षे पूर्ण झाल्याबरोबर नाव मतदार यादीत नोंदवून घेणार असल्याचे प्रतीज्ञापत्र विद्यार्थ्यांकडून घेणे आवश्यक आहे. मात्र हा नियम विद्यापीठाकडून केवळ कागदावरच राहत आहे.
एकाच विद्यार्थ्यास एकाच विद्यापीठाच्या किंवा दोन विद्यापीठाच्या स्वतंत्र दोन पदव्या घेता येत नाहीत. तसे पत्र मुक्त विद्यापीठाकडून केंद्राच्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. परंतू काही विद्यार्थी हा नियम मोडून प्रवेश घेतात.
- प्रा. संजय सोनुने, केंद्र संयोजक,
अभ्यास केंद्र यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, जिजामाता महाविद्यालय, बुलडाणा.