लॉकडाऊनमध्येही ‘दे दारू’, दुकाने बंद असूनही विक्री जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:34 AM2021-05-23T04:34:31+5:302021-05-23T04:34:31+5:30
--दारूद्वारे मिळणाऱ्या महसुलात घट-- जिल्ह्याला २०२०-२१ या वर्षात सुमारे नऊ कोटी रुपयांचा महसूल मद्यविक्रीतून प्राप्त झाला आहे. दरवर्षी साधारणत: ...
--दारूद्वारे मिळणाऱ्या महसुलात घट--
जिल्ह्याला २०२०-२१ या वर्षात सुमारे नऊ कोटी रुपयांचा महसूल मद्यविक्रीतून प्राप्त झाला आहे. दरवर्षी साधारणत: दहा कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपयांचा महसूल राज्य उत्पादन शुल्क विभागाला प्राप्त होतो. त्या तुलनेत या महसुलात काही प्रमाणात घट आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
-- एक कोटीची दारू जप्त--
लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात मद्यविक्री बंद होती. मात्र, छुप्या पद्धतीने दारूची विक्री होत होती. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने पोलिसांच्या सहकार्याने केलेल्या कारवाईत जिल्ह्यात एक कोटी सात लाख १४ हजार ४७ रुपयांची विनापरवाना विक्री होत असलेली दारू जप्त केली आहे.
या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने १,१६३ प्रकरणात कारवाई करून ९३९ व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
--बीअर विक्री घटली, ‘देशी’ची चलती--
जिल्ह्यामध्ये देशी दारूच्या विक्रीत ५ टक्क्यांनी २०१९-२० च्या तुलनेत वाढ झाल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाची आकडेवारी सांगते. विदेशी दारूच्या विक्रीत ४ टक्क्यांनी घट आली आहे, तर बीअरच्या विक्रीत तब्बल १७ टक्क्यांनी घट आली आहे.
--वाईनला पसंती--
देशी दारूची विक्री ५ टक्क्यांनी वाढलेली असली तरी जिल्ह्यात २०२०-२१ या वर्षात वाईनची मागणी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ५३ टक्क्यांनी वाढ झाली असून, २८ हजार ८४९ लिटरवरून ही विक्री ३९ हजार ६२० लिटर एवढी वाढली आहे. त्यामुळे लॉकडाऊनसह निर्बंधाच्या काळात जिल्ह्यात अनेकांनी वाईनला पसंती दिली असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाची आकडेवारी स्पष्ट करते.