पावसाळ्याच्या दिवसांमध्येही बाजारात मेथी ४० रुपये किलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:39 AM2021-08-12T04:39:00+5:302021-08-12T04:39:00+5:30
बुलडाणा : पावसाळ्याचे दोन महिने संपले असले तरी भाजीपाल्याचे भाव मात्र कमी होण्यास तयार नाहीत. त्यामुळे गोरगरिबांच्या जेवणातून भाजीपालाही ...
बुलडाणा : पावसाळ्याचे दोन महिने संपले असले तरी भाजीपाल्याचे भाव मात्र कमी होण्यास तयार नाहीत. त्यामुळे गोरगरिबांच्या जेवणातून भाजीपालाही गायब झाला आहे. कोरोनाचे भय घेऊन जगत असताना महागाईची होरपळ सर्वसामान्यांना असह्य झाली आहे. त्यामुळे ही महागाई थांबणार आहे की नाही, असा प्रश्न घराघरातून उपस्थित केला जात आहे.
मागील काही दिवसांपासून महागाईचा आलेख वाढतच आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. बुलडाणा शहरात आठवडी बाजार, चिखली रोड, सर्कुलर राेड या भागात बाजार मोठ्या प्रमाणात भरतो. सध्या भाजीपाल्याचे भाव वाढले असल्याचे दिसून येत आहे. उपरोक्त भागासह शहरात जांभरुन राेड व इतर परिसरातही प्रत्येकी एक किंवा दोन दुकाने लावण्यात येतात. याठिकाणी तर बाजारापेक्षा नेहमी जास्त भावाने भाजीपाल्याची विक्री करण्यात येत असल्याचे ग्राहकांकडून सांगण्यात येत आहे.
उत्पादन कमी असल्याने भावात वाढ
गेल्या महिन्यात सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे भाजीपाल्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. परिणामी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. याचा परिणाम भाजीपाल्याच्या भावावर झाला असून आता भाजीपाल्याचे भाव वधारले आहेत. बाजारात आवक कमी असल्याने आणखी काही दिवस भाव कमी होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.
व्यापारी म्हणतात...
कोरोनामुळे मागील काही दिवसांत लॉकडाऊनमुळे सर्वच व्यापार ठप्प झाले होते; मात्र भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरूच होता. कोरोना काळात भाजीपाल्याला चांगला भाव मिळाला. त्यामुळे लहान-मोठे व्यापारी समाधानी होते. सध्या पावसाने १५ दिवसांपासून दडी मारली आहे. त्यामुळे काही भाजीपाल्याचे भाव वधारले आहेत.
- राहुल मुळे, व्यापारी.
सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यानंतर भाजीपाल्याचे भाव काही दिवस घसरले होते; मात्र आता पावसाने दडी मारल्यामुळे काही भाजीपाल्याचे भाव पुन्हा वाढले आहेत. मेथीचे उत्पादन कमी असल्याने भाव वाढले आहेत. सध्या मेथी ४० रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे. तर पालकाची जुडी मात्र पाच रुपयाला मिळत आहे.
-पवन माेरे, भाजीपाला विक्रेते.
गृहिणी म्हणतात...
गेल्या काही वर्षांपासून महागाई सतत वाढत आहे. प्रत्येक वस्तूचे भाव वाढले आहेत. गोरगरिबांनी जगायचे कसे. दररोजच्या जेवणातील भाजीपाला महागला असल्याने आता काय खावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- भक्ती वाणी, गृहिणी, वाडी.
कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळातही जादा दराने भाजीपाला घ्यावा लागला. मध्यंतरी काही प्रमाणात भाव कमी झाले होते. आता मात्र पुन्हा भाव वाढल्याने पुन्हा सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.
-शीतल वानखडे, गृहिणी, आंबेटाकळी.
पालेभाज्यांचे भाव (प्रतिकिलो)
मेथी, पालक, चुका, पुदिना, टोमॅटो, शेपू, बटाटे, कोथिंबीर
४० २० २० २० २५ २० २० ४० ते ५०