शाळा सुरु होत असतानाही ७ वीची पुस्तके नाहीत
By admin | Published: June 21, 2017 01:47 PM2017-06-21T13:47:04+5:302017-06-21T13:47:04+5:30
अद्यापही इयत्ता ७ वीची पाठ्यपुस्तके जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील शाळांना मिळाली न ाही.
खामगाव : सर्वशिक्षा अभियान अंतर्गत पात्र शाळांमधील वर्ग १ ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात येतात. मात्र शाळा सुरु होण्यास एक आठवड्याचा अवधी शिल्लक असताना अद्यापही इयत्ता ७ वीची पाठ्यपुस्तके जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील शाळांना मिळाली न ाही. तसेच यावर्षीपासून इयत्ता ९ वीच्या काही विषयांच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. मात्र अभ्यासक्रमात बदल झालेली नवीन पाठ्यपुस्तके अद्याप बाजारात उपलब्ध झालेली नाहीत. तसेच यावर्षीपासून ज्या ठिकाणी १ ते ४ थीपर्यंत शाळा आहे. अशा शाळांमध्ये ५ वा वर्ग नव्यानेच सुरु झाला आहे. तर ज्या ठिकाणी १ ते ७ वीपर्यंत शाळा आहे अशा शाळांना ८ वा वर्ग सुरु करण्यास मान्यता मिळाली आहे. मात्र अशा शाळांमध्ये गतवर्षीची ४ थीची पटसंख्या ग्राह्य धरुन ५ व्या वर्गाची पाठ्यपुस्तके मागविण्यात आली होती. मात्र विद्यार्थ्यांनी इतर शाळांमध्ये प्रवेश घेतल्याने अशा शाळांमध्ये मोफत वाटपासाठी पाठ्यपुस्तके कमी पडणार आहेत. तसेच हीच अडचण इयत्ता ८ वीची पाठ्यपुस्तके वाटप करताना शिक्षकांना येणार आहे. इयत्ता ९ वीच्या गणित विषयाचा अभ्यासक्रम यावर्षीपासून बदलण्यात आला आहे. मात्र बाजारात ही अभ्यासक्रम बदललेली पाठ्यपुस्तके उपलब्ध नाहीत. शाळांपैकी काही खाजगी शाळा सुरु झाल्या आहेत. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा येत्या २७ जूनपासून सुरुहोणार आहेत. मात्र शाळा सुरु होण्यास केवळ आठवड्याचा अवधी शिल्लक असताना पाठ्यपुस्तके उपलब्ध होण्याची प्रतिक्षा केली जात आहे. मोफत वाटपासाठी ७ वीची अनेक विषयांची पाठ्यपुस्तके उपलब्ध नसल्याबाबत सर्वशिक्षा अभियान कार्यालयाशी संपर्क केला असता लवकरच ही पाठ्यपुस्तके प्राप्त होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर ज्या शाळांमध्ये पाठ्यपुस्तके जास्त व विद्यार्थी कमी असतील अशा ठिकाणची पाठ्यपुस्तके इतर गरज असलेल्या शाळांमध्ये देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)