यंदाही वैशाख पौर्णिमेला वन्यप्राणी गणना नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 10:40 AM2021-05-24T10:40:42+5:302021-05-24T10:40:48+5:30
Wildlife census : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या आदेशानंतर यंदाच्या वर्षीही गणना रद्द करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर : दरवर्षी वैशाख पौर्णिमेला होणारी पक्षी व वन्यप्राणी गणना सलग दुसऱ्या वर्षीही होणार नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या आदेशानंतर यंदाच्या वर्षीही गणना रद्द करण्यात आली आहे. यामुळे पक्षी व प्राणिप्रेमींची निराशा झाली आहे.
वन्यजीव संवर्धन कार्यात अधिकाधिक लोकसहभाग मिळावा यासाठी वन्यजीवप्रेमींनाही गणनेमध्ये सहभागी करून घेतले जाते. भारतातील जंगलात वन्यप्राण्यांची संख्या किती हे मोजण्यासाठी भारतीय वन्यजीव संस्थेने पाऊलखुणा आणि पाणवठ्यावर येणाऱ्या वन्यप्राण्यांच्या आधारावर वन्यप्राणी गणना सुरू केली होती. त्यासाठी पाणवठ्याशेजारी मचाण उभारून त्यावरून वन्यजिवांचे निरीक्षण करण्यात येते. ते वन्यजीवप्रेमींना अभ्यासासाठी महत्त्वाची मानली जाते. या उपक्रमातून पक्षी, प्राणी व पर्यावरणाबाबतचे ज्ञान मिळते. यात स्वयंसेवी संस्थांनाही समाविष्ट केले जाते. वैशाख पौर्णिमेला दुपारी गणनेस सुरुवात होते, तर दुसऱ्या दिवशी दुपारी गणना संपविली जाते.
केंद्र सरकारने २३ मार्च २०२० रोजी लॉकडाऊन जाहीर केले होते, तर ७ मे २०२० रोजी वैशाख पौर्णिमा होती.
त्यामुळे २०२० मध्ये गणना झाली नव्हती. यंदाच्या वर्षी लॉकडाऊन असल्याने २६ मे रोजी असणाऱ्या वैशाख पौर्णिमेदिवशी आयोजित करण्यात आलेली गणना रद्द केली आहे.
गणना वैशाख पौर्णिमेलाच का ?
वैशाख पौणिमेच्या दिवशी चंद्राची कक्षा पृथ्वीच्या जवळ असते. चंद्राचा लख्ख प्रकाश पृथ्वीवर पडत असतो. त्यामुळे पक्षी व प्राणी सहज दिसून येतात. मे महिन्यात झाडांची पाने गळालेली असतात. त्यामुळे लांबपर्यंतचे प्राणी मचाणावरून दिसतात. त्यांच्या नोंदी घेऊन त्यांना ओळखणे सोपे जाते. तसेच या नोंदीवरून वनविभागास आपल्या क्षेत्रातील प्राण्यांची माहिती मिळाल्याने त्यांच्या संवर्धनासाठी उपाययोजना करणे सुलभ होते. यासाठी वैशाख पौणिमेदिवशी प्राणी व पक्ष्यांच्या नोंदी केल्या जातात.
महाराष्ट्र शासनाने यंदाच्या वर्षीही वैशाख पौर्णिमा दिवशी गणना करण्यास मनाई केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील वर्षी कोरोना पूर्णपणे नष्ट होऊन गणना करण्याची संधी प्राणी व पक्षिप्रेमींना मिळेल, अशी अपेक्षा आहे.
सुहास कांबळे,
वनपरिक्षेत्र अधिकारी, सोनाळा