प्रत्येक दिव्यांग बांधवाने मतदानाचा हक्क बजवावा - सहाय्यक आयुक्त संजय खडसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 03:27 PM2019-04-05T15:27:22+5:302019-04-05T15:27:33+5:30
‘प्रत्येक मत अमुल्य मत’ आहे. त्यामुळे प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रापर्यंत दिव्यांग बांधवांना घेऊन येण्याची गरज आहे
- योगेश फरपट
खामगाव: प्रत्येक दिव्यांग बांधवांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी शासन विशेष प्रयत्न करित आहे. त्यासाठी प्रत्येक दिव्यांग बांधवांची माहिती संकलित केली असून, मतदानाच्या दिवशी प्रत्येक दिव्यांगाला मतदान केंद्रापर्यंत नेण्याची जबाबदारी बीएलओंची असणार आहे. ‘प्रत्येक मत अमुल्य मत’ आहे. त्यामुळे प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रापर्यंत दिव्यांग बांधवांना घेऊन येण्याची गरज आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेचे सर्व नियोजन झाले आहे, असे सहाय्यक आयुक्त तथा निवडणूक नोडल आॅफिसर प्रा. संजय खडसे यांनी सांगितले.
प्रश्न : दिव्यांग बांधवांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी काय नियोजन केले आहे.
निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक मतदार बांधवांची जबाबदारी महत्वाची ठरते. एका मताचे मुल्य पराभूत झालेल्या उमेदवाराला विचारा. लोकशाही बळकट करण्यासाठी यावर्षी विषेश अभियान राबविण्यात आले. अनेक कारणांनी काही दिव्यांग बांधव मतदानाचा हक्क बजावत नव्हते. या बाबीची प्रकर्षाने नोंद घेण्यात आली. प्रत्येक गाव, शहरातील दिव्यांग बांधवांची माहिती संकलीत करण्यात आली आहे. सर्व दिव्यांग बांधवांना फोन, मॅसेजद्वारे मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रश्न : नेमकी कोणत्या प्रकारची व्यवस्था दिव्यांग बांधवांसाठी केली आहे ?
दिव्यांग बांधवांची यादी प्रत्येक केंद्राच्या बिएलओंकडे देण्यात आली आहे. त्यांची ने-आण करण्यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक संवर्गाच्या दिव्यांग बांधवांना आवश्यक त्या सुविधा केंद्रावर उपलब्ध असतील याची पडताळणी केली जात आहे. व्हीलचेअर, रॅम्प, वाहन आदी सुविधा करण्यात आली आहे. याशिवाय ब्रेन लिपी असलेली इव्हीएम मशिन सुद्धा उपलब्ध असणार आहे.
प्रश्न : ग्रामिण भागात काय नियोजन आहे ?
्रग्रामिण भागात सुद्धा व्हिलचेअरची व्यवस्था ग्रामपंचायत मध्ये करण्यात आली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक, युवतींसह सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांची बैठक घेण्यात आली असून दिव्यांगांच्या संघटनांच्या प्रतिनिधींना याबाबत अवगत करून देण्यात आले आहे. शिवाय प्रसिद्धी माध्यमातूनही व्यापक जनजागृती सुरु आहे. दिव्यांग बांधवांच्या घरापर्यंत जावून त्याचाही आढावा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आहे.
प्रश्न : विभागात किती दिव्यांग मतदार आहेत ?
्न्नअमरावती विभागात ५५ हजाराहून अधिक दिव्यांग मतदार आहेत. ज्यापैकी १० हजार मतदाता अंध आहेत. यावर्षी दिव्यांग बांधवांमध्ये मतदानाविषयी जनजागृती व्हावी यासाठी रॅली, पोस्टर, रांगोळी स्पर्धा घेण्यात येत आहे. सामाजिक, शैक्षणिक संस्थांनी सुद्धा दिव्यांग बांधवांना मतदानासाठी प्रेरीत केल्या जात आहे.