हर घर तिरंगा, हर पेड तिरंगा; वन्यजीव सोयरे बुलढाण्याचे अनोखे अभियान
By ब्रह्मानंद जाधव | Published: August 13, 2023 04:48 PM2023-08-13T16:48:28+5:302023-08-13T16:48:37+5:30
या मोहिमेत वन्यजीव सोयरेकडून चाफ्याच्या फुलाच्या कलमा लावण्यात आल्या. वृक्षसंवर्धनाची शपथ घेण्यात आली
बुलढाणा : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त १३ ऑगस्टपासून हर घर तिरंगा अभियानाला सर्वत्र सुरुवात झाली आहे. बुलढाण्यातील ‘वन्यजीव सोयरे’च्या वतीने हर घर तिरंग्यासोबतच हर पेड तिरंगा असे अनोखे अभियान राबविण्यात आले. संत सेवालाल महाराज टेकडी परिसरातील वृक्षांवर ध्वज लावून "हर पेड तिरंगा" मोहीम राबविण्यात आली.
हर घर तिरंगा अभियान १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येत आहे. हर घर तिरंगा अभियान हा भारत सरकारचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. हे अभियान भारतातील नागरिकांना देशभक्ती आणि स्वाभिमान जागृत करण्यासाठी मदत करेल. हे अभियान भारताला एक मजबूत आणि समृद्ध देश बनवण्यासाठी मदत करेल. हर घर तिरंगा अभियानाद्वारे सरकारची योजना आहे की, भारतातील प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकवावा. आजपासून घराघरावर ध्वज लावण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान ज्ञानगंगा अभयारण्यातील झाडांवर ध्वज लावण्याचा उपक्रम राबविण्याची संकल्पना वन्यजीव सोयरेचे नितीन श्रीवास्तव यांनी मांडली. या संकल्पनेला सर्वांनी प्रतिसाद देत १३ ऑगस्ट रोजी संत सेवालाल महाराज टेकडी परिसरात लावलेल्या झाडांवर ध्वज लावून "हर पेड तिरंगा" मोहीम राबविली.
या मोहिमेत वन्यजीव सोयरेकडून चाफ्याच्या फुलाच्या कलमा लावण्यात आल्या. वृक्षसंवर्धनाची शपथ घेण्यात आली. वन्यजीव सोयरे बुलढाणा यांनी लावलेल्या प्रत्येक झाडावर झेंडा लावला आणि ध्वजासह वृक्षाला देखील सलामी देण्यात आली. या मोहिमेत वन्यजीव सोयरे नितीन श्रीवास्तव, आर्या श्रीवास्तव, विनायक वायाळ, विशाल ढवळे, नितीन धंदर, विशाल बाहेकर, तेजराव राठोड, वनविभागाचे कर्मचारी यांनी श्रमदान केले. या मोहिमेला लागलेल्या चाफा या फुलाच्या कलमा दुर्गादास झगरे यांनी उपलब्ध करून दिल्या.
देशभक्तीला वृक्षसंवर्धनाची जोड
हर पेड तिरंगा घेण्यामागे एक भावनिक नात जोडले आहे. आज निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. निसर्गाचा समतोल ठीक करण्यासाठी वृक्षलागवड व त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. हर पेड तिरंगाच्या माध्यमातून देशभक्ती आणि वृक्षसंवर्धनाची जोड देण्यात येत असल्याचे वन्यजीव सोयरेचे नितीन श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले.