जलदूत बनून प्रत्येकाने जलजागृती करावी - जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 04:44 PM2018-03-17T16:44:17+5:302018-03-17T16:44:17+5:30
पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने जलदूत बनून जलजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी १६ मार्च रोजी बुलडाणा येथे केले.
बुलडाणा : मानवी इतिहासात जलजागृती करावी लागणे ही दुख:द बाब आहे. मानवी उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर पाण्याचे महत्त्व अनन्य साधारण आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पाण्याचे वाढत जाणारे दुर्भिक्ष्य बघता पाण्याचे महत्त्व सर्वाेदीत आहे. अशा परिस्थितीत पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने जलदूत बनून जलजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी १६ मार्च रोजी बुलडाणा येथे केले. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्यावतीने १६ मार्च ते २२ मार्च दरम्यान जिल्हाभरात जलजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. त्याचे उद्घाटन शुक्रवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता नितीन सुपेकर, सिंचन मित्र मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण पाटील, पाणी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र गाडेकर प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, निसर्गाचा लहरीपणा वाढला आहे. त्यामुळे शेतीसाठी व एकत्रितच सर्व क्षेत्रासाठी पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवत आहे. सिंचनाचे प्रमाणही राज्यात १८ टक्के आहे. पाण्याचा अमर्याद होत असलेल्या भूजल उपशामुळे भूजल पातळी कमालीची खलावत आहे. ही धोक्याची घंटा आहे. निसर्गाने निर्माण केलेले जलचक्र अबाधित ठेवून पुढील पिढ्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी पाण्याची बचत करायला पाहिजे. प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात जलसंवर्धनाची प्रभावी कार्यपद्धती अवलंबून काम करावे, असे ते म्हणाले. षण्मुखराजन एस. यांनीही त्यांचे विचार व्यक्त केले. प्रास्ताविक अधीक्षक अभियंता नितीन सुपेकर यांनी केले. सोबतच वॉटर रन स्पर्धा २० मार्च रोजी आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करून चंद्रकांत साळुंखे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, अधिकारी व कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.