संकटकाळी समाजाला मदत करणे प्रत्येकाचंच कर्तव्य -- बिपीन गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 08:02 PM2020-08-22T20:02:17+5:302020-08-22T20:02:48+5:30
लोकवर्गणीतून राज्यातील पहिली टेस्टिंग लॅब उभी करणारे सामाजिक कार्यकर्ते बिपिन गांधी यांच्याशी साधलेला संवाद...
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शिक्षणामुळे स्वत:ची उन्नती होते. तर आरोग्यामुळे स्वत: आणि समाज या दोहोंचीही उन्नती होते. मनुष्य जीवनात तन पवित्र करण्यासाठी सेवा महत्वाची असून दानामुळं मनुष्याच्या जीवनातील गर्वाच हरण होते. हा आपला प्रामाणिक समज आहे. त्यामुळेच कोरोना संकट काळात खामगावकरांसाठी लोकवर्गणीतून राज्यातील पहिली टेस्टिंग लॅब उभी करणारे सामाजिक कार्यकर्ते बिपिन गांधी यांच्याशी साधलेला संवाद...
कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करण्यासाठी कुणाचे सहकार्य लाभले?
सामाजिक दायित्व म्हणून कोरोना विरोधातील लढ्यात सहभागी होताना अमरावती येथील स्वप्नील गावंडे याचं मोलाचे सहकार्य लाभले. लोकवर्गणीतून कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करताना शहरातील काही सामाजिक संस्थांशीही संपर्क साधला. स्थानिक आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी त्यांच्या निधीतून २० लक्ष रुपयांचा निधी दिला. डॉ. गोपाल सोनी यांनी तंत्रज्ञांसह मानसेवी सेवा देण्यास सहकार्य केले. खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयाने इमारत उपलब्ध करून दिली.
कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करताना मार्गदर्शन कोठून घेतले?
लोकवर्गणीतून टेस्टिंग लॅब सुरू करताना सुरूवातीला काही अडचणींचा सामना करावा लागला. तांत्रिक अडचण आल्याने खामगावातील कोरोना टेस्टिंग लॅबचे काम रखडले होते. आता खामगावात दोन टेस्टिंग लॅब कार्यान्वित झाल्या आहेत. तथापि, अगदी सुरूवातीला स्वप्नील गावंडे, आॅल इंडिया मेडीकल सायन्स, द इंडियन कॉन्सील आॅफ मेडीकल रिसर्च आणि आरोग्य संचालकांचे मार्गदर्शन मोलाचं ठरलं.
या उपक्रमामागील प्रेरणा कुणाची?
सामाजिक कार्याची पहिली प्रेरणा आई सुशीला गांधी यांची आहे. त्यानंतर उद्योजक रतन टाटा आणि पळसखेड येथील अनाथ आणि मनोरूग्णासाठी नंदू पालवे यांनी सुरू केलेल्या प्रकल्पामुळे समाजासाठी वेगळं काही तरी करण्याची जागृती निर्माण झाली. कोरोना काळात जीवंत आहात हेच फार मोठं पुण्य आहे. व्यावसायिकानं पैसा बघायचा नसतो. ही भावना नजरेसमोर ठेऊन पारिवारिक निधी समाज कल्याणासाठी वापरला. दान हे या हाताचं त्या हाताला कळायला नको. मात्र, समाजातील सृजनशील व्यक्तींनीमुळेच आपण दान केल्याचे समाजासमोर आलं.
कोविड-१९ टेस्ट मशीन उपलब्ध करण्याची कल्पना सुचली?
कोरोना या विषाणूने जगभर हाहाकार माजविल्यानंतर खामगावातही त्याची झळ पोहोचली. आपल्या उद्योगातील एका कर्मचाºयाचे वडील कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे त्याच्या संपूर्ण परिवाराला रूग्णालयात क्वारंटीन करण्यात आले. खामगावात टेस्टिंग लॅब नसल्यामुळे अहवाल यायला उशीर लागायचा. कर्मचाºयाचे संपूर्ण कुटुंब वेठीस धरल्याचे पाहून खामगावात कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करण्याचा निर्धार केला. त्यानंतर लोकवर्गणीतून राज्यातील पहिलीच कोरोना टेस्टिंग लॅब खामगावात कार्यान्वित करण्यात आली. सुरूवातीला काही अडथळे आले, मात्र, आता या लॅबचा जिल्ह्यातील नागरिकांना लाभ मिळत आहे. ही समाधानाची बाब आहे.