अमरावती विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे परीक्षेचे कामकाज खोळंबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 10:03 AM2020-09-28T10:03:21+5:302020-09-28T10:03:51+5:30
१ आॅक्टोबरपासून होऊ घातलेल्या आॅनलाइन परीक्षांचे नियोजन कसे करावे, असा प्रश्न परीक्षा विभागाला पडलेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी गत काही दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे काही दिवसांवर आलेल्या अंतीम वर्ष/ सत्राच्या परीक्षांचे कामकाज विस्कळीत झाले आहे. त्यामुळे १ आॅक्टोबरपासून होऊ घातलेल्या आॅनलाइन परीक्षांचे नियोजन कसे करावे, असा प्रश्न परीक्षा विभागाला पडलेला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने अंतिम वर्ष/सत्राच्या परीक्षा घेण्याचे नियोजन केले होते. आॅफलाईन परीक्षा घेण्याचे नियोजन असताना शासनाने त्याला मंजूरी दिली नाही.
त्यामुळे, ते रद्द करून विद्यापीठाने आॅनलाईन परीक्षा घेण्याचे नियोजन जाहीर केले आहे. प्राध्यापकांकडून आॅनलाईनच प्रश्न मागविण्यात आले होते. विद्यापीठाकडेजवळपास दीड लाख प्रश्न प्राप्त झाले आहे. अशातच गुरूवारपासून राज्यभरात विद्यापीठांच्या शिक्षकेत कर्मचाºयांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
त्यामुळे, विद्यापीठातील सर्वच विभागाचे काम ठप्प झाले आहे. याचा सर्वाधिक फटका परीक्षा विभागाला बसला आहे. काही दिवसांवर परीक्षा आलेली असतानाच कर्मचाºयांचा संप सूरू झाला आहे. प्रश्नांचे मॉडरेशनच झाले नसल्याने परीक्षा कशी घ्यावी,असा प्रश्न विद्यापीठ प्रशासनाला पडला आहे. येत्या काही दिवसात शिक्षकेतर कर्मचाºयांच्या संपावर तोडगा न निघाल्यास विद्यापीठाला परीक्षा पुढे ढकलाव्या लागण्याची शक्यता आहे. परीक्षेची प्रतीक्षा करणाºया विद्यार्थ्यांना शिक्षकेतर कर्मचाºयांचे संपाचा फटका बसला आहे. संप न मिटल्यास विद्यापीठाच्या आॅनलाईन परीक्षांचे वेळापत्रक विस्कळीत होवू शकते.