जिल्ह्यातील १६४ आरोग्य संस्थेची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 12:48 AM2017-08-10T00:48:44+5:302017-08-10T00:49:08+5:30
बुलडाणा : रिमझिम पावसामुळे डास अळींचे प्रमाण वाढून आजाराचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढते. त्यातच शहरी भागातील आरोग्य सेवा देणार्या संस्थे परिसरात डास अळींचे उत्पत्ती स्थान दिसून येतात. त्यामुळे उपचारासाठी भरती असलेल्या रुग्णांचे जीवन धोक्यात येते. या पृष्ठभूमीवर जिल्हा हिवताप कार्यालयाकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. यावेळी तपासणी केलेल्या १६४ आरोग्य संस्थेपैकी चार आरोग्य संस्था परिसरात डास अळी असलेले दूषित कंटेनर आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
हर्षनंदन वाघ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : रिमझिम पावसामुळे डास अळींचे प्रमाण वाढून आजाराचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढते. त्यातच शहरी भागातील आरोग्य सेवा देणार्या संस्थे परिसरात डास अळींचे उत्पत्ती स्थान दिसून येतात. त्यामुळे उपचारासाठी भरती असलेल्या रुग्णांचे जीवन धोक्यात येते. या पृष्ठभूमीवर जिल्हा हिवताप कार्यालयाकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. यावेळी तपासणी केलेल्या १६४ आरोग्य संस्थेपैकी चार आरोग्य संस्था परिसरात डास अळी असलेले दूषित कंटेनर आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस होऊन ठिकठिकाणी डबके साचून आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्यात मागील काही दिवसांपासून व्हायरलचा प्रकोप वाढला असून, मलेरिया, डेंग्यू रुग्णांची संख्या वाढली आहे. दिवसा ऊन-पाऊस आणि सकाळ- सायंकाळी दमट वातावरणामुळे व्हायरलचा प्रकोप वाढला आहे. खासगी हॉस्पिटलसह जिल्हा सामान्य रुग्णालयात खोकला, ताप आणि श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांची संख्याही वाढली. त्यामुळे जानेवारी ते जुलै २0१७ मध्ये जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाकडून २ लाख ४६ हजार ९८३ रक्त नमुने गोळा करून तपासणी करण्यात आली. त्यात मलेरियाचे १८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, त्यातील जुलै महिन्यात आठ रुग्ण आढळले. या पृष्ठभूमीवर शासनाच्या आरोग्य विभागाकडून जिल्हा हिवताप कार्यालयास १ ते ३ ऑगस्टदरम्यान शहरी भागातील आरोग्य संस्थेची तपासणी करण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यातील ११ तालुक्यांतील शहरी भागात असलेल्या आरोग्य संस्थेची तपासणी जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पाच आरोग्य सहायक व २२ कर्मचार्यांनी पूर्ण केली. तसेच संबंधित अहवाल ५ ऑगस्ट रोजी शासनाकडे सादर केला. त्यात १६४ आरोग्य संस्थेपैकी चार आरोग्य संस्था परिसरात डास अळींचे दूषित कंटेनर आढळून आले.
या चार संस्थांमध्ये आढळले दूषित कंटेनर!
जिल्ह्यात संग्रामपूर व मोताळा तालुका वगळून इतर ११ तालुक्यांतील शहरी भागातील आरोग्य संस्था म्हणजे शासकीय तसेच खासगी हॉस्पिटल परिसरात डास अळींचे दूषित कंटेनर शोध मोहीम १ ते ३ ऑगस्टदरम्यान राबविण्यात आली.
त्यात चार आरोग्य संस्था परिसरात दूषित कंटेनर आढळून आले. दूषित कंटेनर आढळून आलेल्या आरोग्य संस्थेमध्ये ग्रामीण रुग्णालय चिखली येथे तपासलेल्या आठ कंटेनरपैकी एक दूषित आढळले.
मल्टी हॉस्पिटल मेहकर येथे एका कंटेनरची तपासणी केली असता दूषित आढळले. गजानन हॉस्पिटल मेहकर येथे एका कंटेनरची तपासणी केली असता, दूषित आढळले. तसेच डॉ. कलावटे हॉस्पिटल शेगाव येथे तीन कंटेनरची तपासणी केली असता, एक कंटेनर दूषित आढळले.
मागील वर्षापेक्षा यावर्षी मलेरियाचे रुग्ण कमी
जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाकडून मागील वर्षी सन २0१६ मध्ये ४ लाख ७९ हजार २६७ रक्त नमुने तपासण्यात आले होते. त्यात ६४ मलेरियाचे रुग्ण आढळले होते. तर यावर्षी मागील सात महिन्यात जानेवारी ते जुलै २0१७ मध्ये २ लाख ४६ हजार ९८३ रक्त नमुने गोळा करून तपासणी करण्यात आली. त्यात मलेरियाचे १८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, त्यातील जुलै महिन्यात आठ रुग्ण आढळल्यामुळे मलेरियाचे प्रमाण कमी आहे.
शासनाच्या आदेशान्वये जिल्ह्यातील शहरी भागात डास अळी शोध मोहीम राबविण्यात आली. त्यात ज्या आरोग्य संस्था परिसरात दूषित कंटेनर आढळून आले, त्या संस्थेला कंटेनर तसेच परिसर स्वच्छ ठेवण्याचा आदेश देऊन आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या.
-एस.बी. चव्हाण, जिल्हा हिवताप अधिकारी, बुलडाणा.