हिवखेड पूर्णा घाटातून नियमापेक्षा जास्त उत्खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:37 AM2021-04-28T04:37:21+5:302021-04-28T04:37:21+5:30
सिंदखेडराजा : तालुक्यातील हिवरखेड पूर्णा येथील वाळूघाटात सध्या अनेक नियमबाह्य कामे सुरू आहेत. नियमापेक्षा जास्त वाळू उत्खनन केले जात ...
सिंदखेडराजा : तालुक्यातील हिवरखेड पूर्णा येथील वाळूघाटात सध्या अनेक नियमबाह्य कामे सुरू आहेत. नियमापेक्षा जास्त वाळू उत्खनन केले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष सिद्धार्थ जाधव यांनी केला आहे. या संदर्भात जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे़ वाळूघाटातील नियमबाह्य कामे सुरू असल्याने त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होणार असल्याने याची चौकशी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
हिवरखेड पूर्णा वाळूघाटाचा लिलाव झाल्यानंतर प्रशासनाने वाळू उत्खननासाठी अनेक नियम घालून दिले आहेत. ज्यात कोणत्या गटातून वाळू उपसायची किती, किती लांबी, रुंदी असावी याची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. परंतु आर्थिक लाभासाठी नदीपात्र रिकामे करण्याचे काम वाळू माफिये करीत आहेत. याला प्रशासनातील कोणाची फूस किंवा मदत होते का, याची चौकशी करण्याची मागणी जाधव यांनी निवेदनात केली आहे़ या प्रकाराने पर्यावरणाची मोठी हानी होत आहे़ या गंभीर प्रकाराकडे सोईस्कर दुर्लक्ष केले जात असेल तर याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. हिवारखेड पूर्णा येथील वाळूघाटाचा आकार ३०० मीटर लांब, ५० मीटर रुंद व १ मीटर खोल असा असून यातून ठरवून दिलेल्या कालावधीत ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत असणार असला तरीही पावसाळा सुरू झाल्यास १० जूनपासून वाळू उपसा बंद ठेवावा लागणार आहे. पुढील रिस्क नको म्हणून वाळूउपसा अत्यंत वेगाने सुरू आहे.
दरम्यान, जाधव यांनी दिलेल्या निवेदनात वाळूसाठी १० फुटांपर्यंत खड्डे खोदले जात असून, अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे म्हटले आहे. नदीपात्रात पोकलॅन नेता येत नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर असलेले खड्डे बुजविण्यासाठी याचा वापर केला जात आहे. वाळू घाटाचे मोजमाप करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी जाधव यांनी केली आहे.