भानामतीच्या पूजेने अडगावात खळबळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:30 AM2021-01-21T04:30:57+5:302021-01-21T04:30:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक संपताच, निवडणूक झालेल्या विविध गावातील हेवेदावे आणि वाद विकोपाला जात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक संपताच, निवडणूक झालेल्या विविध गावातील हेवेदावे आणि वाद विकोपाला जात असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर येत आहे. निवडणुकीदरम्यान खामगाव तालुक्यातील अडगाव येथे भानामतीची पूजा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या पूजेनंतर, तसेच अनेक ठिकाणी पराभव जिव्हारी लागल्याने आगामी काळात वाद विकोपाला जाण्याचे संकेत आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान वर्चस्वाच्या लढाईतून खामगाव तालुक्यातील सुटाळा बु., नांदुरा तालुक्यातील महाळुंगी, वाडी येथे हाणामारीच्या घटना समोर आल्या. घाटावरील काही ठिकाणी वादाच्या घटना घडल्या. निवडणूक, मतमोजणी संपल्यानंतरही गावगाडे शांत बसायचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. खामगाव तालुक्यातील अडगाव येथे विरोधी पॅनलच्या ११ सदस्यांच्या नावाने हिवराच्या झाडाजवळ ‘भानामती’ची पूजा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मतमोजणीच्या आदल्या दिवशीच्या रात्री घडलेला हा प्रकार मंगळवारी सायंकाळी उजेडात आला. या प्रकारामुळे अडगाव येथे एकच खळबळ उडाली आहे.
चौकट...
११ मडकी फोडण्यापूर्वी दोऱ्यांना गळफास!
अडगाव येथील साहेबराव सुरवाडे यांच्या
शेतशिवारात ११ मडके फोडून पूजा करण्यात आली. येथे मोठे मातीचे दिवेही फोडण्यात आले आहे. मडके फोडण्यापूर्वी पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या रंगीबिरंगी दोऱ्याच्या साहाय्याने प्रत्येक मडक्याला गळफास लावण्यात आला आहे.
कोट...
विरोधी पॅनल पडावे, म्हणून ११ मडक्यांची पूजा करण्याचा अडगाव येथील प्रकार अतिशय घृणास्पद आहे. लोकशाही मूल्य पायदळी तुडविण्याच्या या प्रकाराची पोलिसांनी त्वरित दखल घेत, संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी. दहशत निर्माण करण्यासाठी अघोरी पूजा केली असावी.
- नरेंद्र लांजेवार
राज्य कार्यकारिणी सदस्य,
अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र
कोट...
मतदानाच्या आदल्या दिवशी आपल्या शेत शिवारात ११ मडकी ठेवून पूजा करण्यात आली आहे. हा प्रकार सोमवारी शेतात आल्यानंतर निदर्शनास आला. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या ११ एवढी आहे. ११ जणांचे विरोधी पॅनल पडावे, म्हणून हा प्रकार केला असावा, अशी गावात चर्चा आहे.
- साहेबराव सुरवाडे
शेतकरी, अडगाव ता. खामगाव.
---
कोट...
अडगाव येथे अघोरी पूजेच्या प्रकाराची अद्याप माहिती नाही. भानामती, अघोरी पूजा ही एक अंधश्रद्धा आहे. यामुळे कुणाचेही बरे-वाईट होत नाही. तथापि, या प्रकरणी तक्रार आल्यास पूजा करणाऱ्यांचा शोध घेतला जाईल.
- रफिक शेख
पोलीस निरीक्षक, खामगाव (ग्रामीण)