सरपंच पतीच्या कमिशन मागण्याच्या ऑडिओने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:28 AM2021-01-04T04:28:57+5:302021-01-04T04:28:57+5:30
मेहकर तालुक्यातील बेलगाव एक मोठी ग्रामपंचायत आहे. राजकीय वलय असल्याने बेलगावमध्ये सर्वांचे लक्ष राहते. या ग्रामपंचायतीचे कामे करण्यासाठी मेहकर ...
मेहकर तालुक्यातील बेलगाव एक मोठी ग्रामपंचायत आहे. राजकीय वलय असल्याने बेलगावमध्ये सर्वांचे लक्ष राहते. या ग्रामपंचायतीचे कामे करण्यासाठी मेहकर येथील कंत्राटदार सचिन देशमुख यांना काम देण्यात आले होते. त्यांनी ते काम पूर्ण केले. या पूर्ण केलेल्या कामाच्या देयकाच्या धनादेशकरिता ठेकेदाराने बेलगावचे सरपंचांना मागणी केली असता, सरपंच पतींनी पाच टक्के कमिशन अगोदर जमा करा, त्यानंतरच उर्वरित रक्कमेचे धनादेश दिले जाईल, असे त्या रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ क्लिपवरून ऐकल्यानंतर लक्षात येते. परंतु सरपंच पती नितीन मुठाळ यांनी त्या रेकॉर्डिंग केलेल्या ऑडिओ क्लिपमधील तो मी नव्हेच अशी भूमिका घेतली असल्याने संबंधित प्रकरण काय आहे याची सध्या चर्चा होत आहे. मात्र या ऑडिओ क्लिपमुळे कमिशनची मागणी करणाऱ्यांची धाबे दणाणले आहेत. यानंतर अशा व्यवहारात धोका निर्माण झाल्याने भ्रष्टाचाराला आळा बसेल असे मत व्यक्त केले जात आहे.
ठेकेदाराने केलेल्या कामाचे सर्व देयके अदा करण्यात आली आहेत. त्या ऑडिओ क्लिपमधील तो मी नव्हेच हे राजकीय डावपेच आहेत.
नितीन मुठाळ, सरपंच पती, बेलगाव
बेलगाव येथे केलेले ग्रामपंचायतीच्या कामाचे धनादेश देण्याकरिता अनेकवेळा सरपंचांनी टाळाटाळ केली. केलेले काम हे उत्कृष्ट दर्जाचे असून, यामुळे आगाऊ रक्कम देण्यास नकार दिल्याने मला त्रास झाला.
सचिन देशमुख, कंत्राटदार, मेहकर