सखी मतदान केंद्रावर महिलांचा उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 01:32 PM2019-10-21T13:32:01+5:302019-10-21T13:32:10+5:30
तदान केंद्रावरील सुविधांमुळे मतदानाबाबत महिलांमध्ये उत्साह दिसून आला.
खामगाव: येथील मोहता महिला विद्यालयात महिलांसाठी सखी मतदान केंद्राची उभारणी निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आली. या मतदान केंद्रावरील सुविधांमुळे मतदानाबाबत महिलांमध्ये उत्साह दिसून आला.
विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान झाले. खामगाव विधानसभा मतदारसंघात खामगाव शहरात मोहता महिला महाविद्यालयात सखी मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली. तर याच परिसरात नॅशनल हायस्कूलमध्ये आदर्श मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली. दोन्ही मतदान केंद्रांवर मतदारांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे मतदारांमध्ये सकाळपासूनच उत्साह दिसून आला. सखी महिला मतदान केंद्रावर उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉर्इंटचे महिलांना विशेष आकर्षण दिसून आले. महिलांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावत सेल्फी घेतला. नवमतदारांमध्येही प्रचंड उत्साह दिसून आला. भारतीय लोकशाही मजबूत करण्यासाठी जास्तीत मतदान व्हावे, यासाठी निवडणूक विभागाकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी सखी मतदार केंद्र, आदर्श मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली. सखी मतदान केंद्रावर स्वच्छता गृह, पाण्याची व्यवस्था मतदारांसाठी करण्यात आली. नवमतदारांना आकर्षित करण्यासाठी सेल्फी पॉर्इंटसह मतदान केंद्राची सजावट करण्यात आली. महिलांनी जास्तीत जास्त मतदान करावे, यासाठी बालसंगोपन गृह येथे उभारण्यात आले होते. या मतदान केंद्रावर महिला कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली. नॅशनल हायस्कूलमध्ये उभारण्यात आलेल्या आदर्श मतदान केंद्रावरही मतदारांना सर्वच सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांनी मदत केली. दरम्यान दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सखी मतदार केंद्र क्रमांक ११२ वर एकूण ७३१ मतदारांपैकी १५० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तर आदर्श मतदान केंद्र क्रमांक ११३ वर ११३ पुरूष व १२७ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला.
नगराध्यक्षांसह महिलांनी घेतला सेल्फी!
सखी मतदार केंद्रावर सकाळीच नगराध्यक्षा अनिता डवरे यांच्यासह महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी नगराध्यक्षांसोबत सेल्फी पॉर्इंटवर महिलांना सेल्फी घेतला. दिवसभर या मतदान केंद्रावर महिलांनी मतदानासाठी गर्दी केली.
दिव्यांग बांधवांनी बजावला मतदानाचा हक्क!
खामगाव शहरात दिव्यांग बांधवांनीही उत्साहात मतदान केले. लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन पवन मेतेकर, अमोल भवरे, मनोज नगरनाईक यांनी केले.
मतदारांनी मतदानाचा विषय गांभीर्याने घ्यावा. लोकशाहीसाठी मतदान आवश्यक आहे. मतदानापासून कोणीही वंचित राहणार नाही, याची काळजीही प्रत्येकाने घेण्याची गरज आहे.
वैशाली घोरपडे, मतदार खामगाव.
सखी मतदान केंद्रावरील सुविधांमध्ये मतदानाबाबत विशेष आकर्षण वाटले. येथे मतदारांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा बघता, आम्हा युवतींमध्ये मतदानाबाबत उत्साह आहे. सर्वांनीच मतदान करावे
पल्लवी पाटील, युवा मतदार खामगाव.