स्थलांतरितांची नावे यादीतून वगळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:30 AM2021-04-05T04:30:20+5:302021-04-05T04:30:20+5:30
बुलडाणा : स्थलांतरित व मयत मतदारांची नावे यादीतून वगळण्यात यावी, अशी मागणी रामेश्वर पोफळे यांनी शुक्रवारी तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे ...
बुलडाणा : स्थलांतरित व मयत मतदारांची नावे यादीतून वगळण्यात यावी, अशी मागणी रामेश्वर पोफळे यांनी शुक्रवारी तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. स्थलांतरित व मयत मतदारांची नावे यादीत असल्याने मतदानाची टक्केवारी कमी होत आहे.
ओव्हरलोड वाहतुकीमुळे, अपघातात वाढ
मोताळा : ओव्हर लोड कापूस वाहतूक जीवघेणी ठरत असताना, यंत्रणेकडून याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. आठवडाभरापूर्वी एक वाहन पलटी होऊन अपघाताची घटना घडली आहे. असे असतानाही ओव्हरलोड माल वाहतूक सुरूच असल्याचे दिसून येत आहे.
नांदुरा-मोताळा रस्ता कामाला वेग
मोताळा : नांदुरा-मोताळा रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याची तक्रार नागरिकांनी शुक्रवारी बांधकाम विभागाकडे केली होती. या मागणीची दखल घेत, बांधकाम विभागाने संबंधित कंत्राटदारास रस्त्याने काम वेगाने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे या रस्त्याच्या कामास वेग आला आहे.
वीजचोरीप्रकरणी कारवाईची मागणी
अमडापूर : येथे गेल्या महिनाभरापासून सर्रासपणे खांबावर आकोडे टाकून विद्युत चोरी केली जात आहे. यामुळे महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वीजचोरी करणाऱ्यांवर महावितरणने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी शुक्रवारी केली.
अग्निरोधक यंत्रणांंची तपासणी आवश्यक
बुलडाणा : अग्निशमन अधिनियमानुसार, १५ मीटर उंचीच्या इमारती, अपार्टमेन्ट, वाणिज्य संकुल, मंगल कार्यालये आदी सर्वच ठिकाणी अग्निरोधक यंत्रणा उभारणे अत्यावश्यक आहे. मात्र, भंडारा येथील घटनेनंतरही अशी यंत्रणा आहे की नाही, या तपासणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
थकीत निधी देण्याची मागणी
चिखली: धडक सिंचन विहिरी योजनेचा थकीत निधी देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत तालुक्याला ७०० विहिरी मंजूर झाल्या. शेतकऱ्यांनी खोदकाम व बांधकाम केले, परंतु ते पैसे मिळाले नाहीत.
शेतकऱ्यांना सौरऊर्जेचे कुंपण अनुदान द्यावे
मोताळा : वन्यप्राण्यांमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होते. प्राण्यांकडून शेतकऱ्यांवर हल्लेही होतात. हे टाळण्यासाठी वनविभागाने शेतकऱ्यांना सौरऊर्जेवरील कुंपण उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी गुरुवारी वनविभागाकडे केली आहे.
मूर्ती परिसरात पाणीटंचाई
मोताळा : मूर्ती परिसरातील गावांमध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. प्रशासनाने या भागातील पाणीटंचाई दूर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
परीक्षा शुल्क माफ करण्याची मागणी
बुलडाणा : परतीच्या पावसामुळे या भागातील पिकांचे नुकसान झाले. यामुळे उत्पादनात घट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी शुक्रवारी केली.
शौचालयाची समस्या निकाली काढा
बुलडाणा : शहरातील जुने शौचालय पाडून त्या ठिकाणी नवे सार्वजनिक शौचालय बांधावे. ज्या कुटुंबाकडे शौचालय नाहीत, त्यांना त्यांच्या घरासमोरील जागेत शौचालय बांधण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात गुरुवारी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
----------