नगर पालिका कर्मचारी संघटनेची कार्यकारिणी ठरतेय औटघटकेची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 02:23 PM2018-07-11T14:23:43+5:302018-07-11T14:26:50+5:30
खामगाव: महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संघटनेत पडलेल्या दोन गटांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू असतानाच, रविवारी शेगाव येथे गठीत कार्यकारिणीतील अनेकांनी राजीनामा सत्र सुरू केले.
- अनिल गवई
खामगाव: महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संघटनेत पडलेल्या दोन गटांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू असतानाच, रविवारी शेगाव येथे गठीत कार्यकारिणीतील अनेकांनी राजीनामा सत्र सुरू केले. त्यामुळे शेगाव येथे गठीत संघटनेची राज्यस्तरीय कार्यकारिणी औटघटकेची ठरत असल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्र राज्यातील नगर पालिका, महानगर पालिका आणि नगर पंचायत स्तरावरील कर्मचाºयांच्या समस्या सोडविण्यासाठीचे मजबूत संघटन असलेल्या महाराष्ट्र राज्य नगर पालिका नगर पंचायत, महानगर पालिका कर्मचारी संघटनेत काही दिवसांपासून मतभेद निर्माण झाले आहेत. सुमारे ६० हजार सदस्य असलेल्या राज्य कार्यकारिणीतील दोन गटात वाद उफाळून आल्याने, रविवार ८ जुलै रोजी शेगाव येथे संघटनेचे नेते के.के. आंधळे यांच्या नेतृत्वात संघटनेचा मेळावा घेण्यात आला. यावेळी आयोजित सभेत २१ सदस्यीय राज्य कार्यकारिणी गठीत करण्यात आली. तसेच काही सल्लागार सदस्यांचीही निवड करण्यात आली. ही कार्यकारिणी जाहीर होण्यास जेमतेम २४ तासांचा कालावधी उलटत नाही तोच, या कार्यकारिणीतील ९ जणांनी या कार्यकारिणीशी आपला सूतराम संबंध नसल्याचे जाहीर केले. तर काहींनी लेखी राजीनामा सत्रच सुरू केल्याने, संघटनेच्या शेगाव येथे गठीत झालेल्या राज्यस्तरीय कार्यकारिणीला ग्रहण लागल्याचे दिसून येते. बुधवारपर्यंत कार्यकारिणी सदस्यांसोबतच सल्लागारांनीही कार्यकारिणीशी संबंध नसल्याचे, तसेच आपण नावे दिली नाहीत, असा खुलासा केला. त्यामुळे प्रवर्तक के.के. आंधळे यांना निवड झालेल्या सदस्यांच्या प्रतिनिधींनी नावे दिली असतील तर त्यांना कार्यकारिणीतून वगळण्यात येईल, अशी माघार घ्यावी लागली. या गोष्टीवरून कर्मचाºयांच्या संघटनेतील वातावरण राज्यभर चांगलेच तापले असल्याचे दिसून येते.
राजीनामा सत्रास सुरूवात: आंधळे यांचा गट अडचणीत!
शेगाव येथे रविवारी गठीत कार्यकारिणीतील अनेकांनी लेखी तसेच सोशल मिडीयावर राजीनामा सत्र सुरू केले. २१ जणांच्या कार्यकारिणी सोबतच काही सल्लागारांनीही राजीनामास्त्र उपसल्याने के.के. आंधळे यांचा गट अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. दरम्यान, कार्यकारिणीत नसलेल्या काही पालिका कर्मचाºयांनी के.के. आंधळे यांचे नेतृत्व अमान्य करीत, विश्वनाथ घुगे यांच्या नेतृत्वात १४ जुलैच्या सर्वसाधारण सभेची तयारी चालविली आहे. खामगाव येथील नगर पालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आनंदमोहन अहीर यांनी तसेच घाटाखालील बहुताशं कर्मचाºयांनी घुगे यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकला आहे. त्यामुळे संघटनेत आगामी घडामोडींवर अनेकांचे लक्ष लागून आहे.
शेगाव येथे खिरापतीसारखी वाटली पदे!
शेगाव येथील मेळाव्यात कार्यकारिणीतील अनेकांना अनुपस्थितीत पदे देण्यात आली. काहींनी नावही न देता पद देण्यात आल्याचे अनेकांना आश्चर्य होत आहेत. तर काहींना संघटनेत कार्यरत असताना पुन्हा त्याच पदावर नियुक्ती देण्यात आली. त्यामुळे संघटनेचा शेगाव येथील मेळावा एक नाट्य ठरत असल्याची ओरड आता पालिका कर्मचाºयांमध्ये होवू लागली आहे. दरम्यान, हा मेळावाच बेकायदेशीर असल्याचा आरोपही एका पदाधिकाºयाने केला.
- रविवारी शेगाव येथे संघटनेच्या मेळाव्याला आपण उपस्थित नसताना पद देण्यात आले. कोणतीही पूर्व सूचना न देता आपणास राज्याचे कोषाध्यक्ष करण्यात आले. ही निवड आपणाला मान्य नाही. संघटनेत फूट पाडणे चुकीचे आहे.
-वैजनाथ स्वामी, माहूर
शेगाव येथील मेळावा बेकायदेशीर आणि व्यक्तीकेंद्रीत आहे. संघटनेच्या उपविधीला अनुसरून हा मेळावा नाही. त्यामुळे या मेळाव्यात घोषीत करण्यात आलेली कार्यकारिणी कुणालाही मान्य नाही. कुणा विरोधात तक्रार असल्यास, आंधळे यांनी कार्यकारिणी सदस्यांशी चर्चा करून निर्णय घ्यायला हवे होते. संघटनेत फूट पाडायला नको होती.
- सुभाष मोरे, इचलकरंजी