पिके वाचविण्यासाठी कसरत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 01:08 AM2017-10-14T01:08:19+5:302017-10-14T01:10:40+5:30
लिहा बु.: परिसरात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकर्यांची कसरत सुरू आहे. या परतीच्या पावसाचा फटका सोयाबीन, कापसाला बसला असून, शेतकर्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लिहा बु.: परिसरात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकर्यांची कसरत सुरू आहे. या परतीच्या पावसाचा फटका सोयाबीन, कापसाला बसला असून, शेतकर्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
मोताळा तालुक्यातील लिहा बु. विभागात प्रथमपासून शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होते; मात्र परतीच्या पावसाने सुरुवातीला कमी वेळात दोन दिवस झालेल्या चांगल्या पावसामुळे शेतकर्यांच्या चेहर्यावर आनंद दिसत होता. या पावसामुळे विभागातील नदी, नाल्यावरील बंधार्यामध्ये पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे भविष्यात कपाशी, तूर व रब्बी पिकांना एक-दोन पाणी देऊन आपल्या उत्पन्नात वाढ करू शकतो; मात्र संततधार पावसामुळे शेतकर्यांच्या समस्येत भर पडली असून, सोयाबीन व कापसाला फटका बसण्याची शक्यता आहे.
या आठवड्यात प्रथमपासूनच आकाशात ढगाळ वातावरण तयार झाल्यामुळे कापूस वेचणीसाठी मजुरीचे दर वधारले आहेत. हवामान खात्याच्या इशार्यामुळे गावातील काही शेतकर्यांनी मुनादी देऊन प्रचलित दरापेक्षा प्रति किलो कापूस वेचणीत वाढ करून स्वत:च्या शेतातील कापूस पावसाअगोदरच गोळा केला; परंतु कित्येक शेतकरी मजुरी वाढविण्यासाठी तयार नसल्यामुळे शेतमजूरसुद्धा जिकडे मजुरी वाढ मिळेल, त्यांच्या शेतात जाण्यास प्राधान्य देत होते. त्यामुळे मजुराप्रती शेतकर्यांमध्ये रोष निर्माण होताना दिसत होता. त्यामुळे संततधार पावसाने काही शेतकर्यांना फटका दिला. या परिसरातील अनेक शेतकर्यांचे सोयाबीन शेतात सोंगणीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी काही शेतकर्यांच्या सोयाबीनला अंकुर फुटण्याची शक्यता आहे.
ज्या शेतकर्यांनी मजुरी कमी होईल व दर वाढविण्यास अनुकूलता दाखविली नाही, त्यांना सदर पावसामुळे मोठे नुकसान होऊन आर्थिक फटका बसणार आहे. या पावसामुळे शेतात कापणीसाठी आलेले सोयाबीन, ज्वारी काळी होण्याची शक्यता असून मका, ज्वारीचा चारा काळा झाला आहे, तर सतत पाऊस असल्यामुळे साेंगणीसाठी त्रास होत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीच्या कामात कोणतीही दिरंगाई यापुढे शेतकरी वर्गासाठी नुकसानीत भर टाकणारी ठरणार आहे. त्यामुळे मजुरीत वाढ करण्याबाबत शेतकर्यांनी आपले धोरण बदलून लवचिक करावे व पिकाची अवस्था व निसर्गाचा लहरीपणा यामध्ये समन्वय साधून मजुरी दरात वाढ देणे आवश्यक झाले आहे. आपल्या मालास चांगला बाजार भाव मिळण्यासाठी त्याची प्रत टिकवून ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे अनेक शेतकरी मजुरांना वाढीव मजुरी देत असल्यामुळे शेतकर्यांना आर्थिक फटका बसणार आहे.