विद्यार्थ्यांनी साकारलेल्या शाडू मातीच्या गणेश मूर्तींचे प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:35 AM2021-09-11T04:35:54+5:302021-09-11T04:35:54+5:30
चिखली : दि. चिखली अर्बन विद्यानिकेतनद्वारे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच गणेशोत्सवादरम्यान पर्यावरणाबाबत जनजागृती व्हावी या उदात्त हेतूने यंदाही ...
चिखली : दि. चिखली अर्बन विद्यानिकेतनद्वारे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच गणेशोत्सवादरम्यान पर्यावरणाबाबत जनजागृती व्हावी या उदात्त हेतूने यंदाही विद्यार्थ्यांसाठी शाडूमातीपासून गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी साकारलेल्या गणेश मूर्तींचे प्रदर्शन ९ सप्टेंबरपासून भरविण्यात आले आहे.
दि. चिखली अर्बन विद्यानिकेतन ही शाळा नेहमी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी प्रयत्नशील असते. या अंतर्गत शाळेचे शिक्षक गोपाल शर्मा व इतर शिक्षकांच्या मार्गदर्शनात आयोजित कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक शाडूमातीपासून आकर्षक गणेशमूर्ती साकारल्या आहेत. शाडूमातीपासून गणेशमूर्ती बनविल्यानंतर कलाशिक्षक विनायक ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आकर्षकपणे रंगविले देखील आहेत. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या या आकर्षक गणेशमूर्तीचे प्रदर्शन ९ सप्टेंबर रोजी दि. चिखली अर्बन बँकेसमोर करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन दि. चिखली अर्बनचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम दिवटे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी संचालक शामसुंदर पारीख, शाळेचे प्राचार्य गौरव शेटे, प्रतीक बावस्कर, शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या आकर्षक गणेशमूर्ती भाविकांनी स्वेच्छेने दिलेल्या देणगीत भाविकांना उपलब्ध करून देण्यात आल्या. याद्वारे मिळालेली देणगी राज्यातील पूरग्रस्तांना मदतीसाठी देऊन विद्यार्थ्यांमध्ये परस्पर सहकार्य व बंधूभाव वाढविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. दरम्यान, शाळेच्या या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणरायाचे आपल्या घरी विराजमान करण्याची संधी परिसरातील नागरिकांना उपलब्ध झाली असल्याने दि. चिखली अर्बन विद्यानिकेतनच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक होत आहे.