खामगाव, जालना रल्वे मार्गाच्या अपेक्षा वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:35 AM2021-07-31T04:35:01+5:302021-07-31T04:35:01+5:30
ब्रिटिश काळात मंजूर झालेल्या विदर्भ, मराठवाडा या दोन विभागांना जोडणारा १५५ किलोमीटर लांबीचा खामगाव, जालना रेल्वेमार्गाचा प्रश्न प्रशासनाच्या उदासीन ...
ब्रिटिश काळात मंजूर झालेल्या विदर्भ, मराठवाडा या दोन विभागांना जोडणारा १५५ किलोमीटर लांबीचा खामगाव, जालना रेल्वेमार्गाचा प्रश्न प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे प्रलंबित पडला आहे. हा रेल्वेमार्ग सुरू व्हावा, यासाठी उन्द्री येथील सामाजिक कार्यकर्ते शंकरराव पाटील यांनी लढा उभारला. त्यासाठी संघर्ष समिती स्थापन केली होती. नंतरच्या काळात मात्र ही बाब गांभीर्याने न घेतल्याने हा मार्ग दुर्लक्षित झाला. रेल्वे खात्याची जबाबदारी ममता बॅनर्जी यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी जिल्ह्यावर ममता दाखवत या मार्गाची सर्वेक्षण करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली. परंतु त्यानंतर त्यांनी रेल्वे मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि सर्वेक्षणाची घोषणा ही घोषणा पुरतीच ठरली. खामगाव-जालना रेल्वे मार्गाची संपूर्ण माहिती असणारे केंद्रात आता रावसाहेब दानवे यांना रेल्वेमंत्री पदाची जबाबदारी मिळाली आहे. त्यामुळे आता नागरिकांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात पल्लवित झाल्या आहेत.
समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात
देऊळगाव राजा परिसरातून समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे या अगोदर जर रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळाली, तर ती परिसरासाठी विकासाचा मैलाचा दगड ठरेल. त्यामुळे लवकरात लवकर लोहमार्ग कामाला गती देण्याची मागणी डॉ. सुनील कायंदे यांनी रेल्वेमंत्री आमदार रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे.