महागडे माेबाइल लंपास करणारा जेरबंद, रायपूर पाेलिसांची कारवाई
By संदीप वानखेडे | Published: December 15, 2023 01:18 PM2023-12-15T13:18:08+5:302023-12-15T13:30:09+5:30
रायपूर पाेलिस स्टेशनअंतर्गत असलेल्या सैलानी दर्गा येथे देशभरातून हजाराे भाविक दर्शनासाठी येत असतात.
पिंपळगाव सराई : सैलानी दर्गा परिसरात आलेल्या भाविकांचे महागडे माेबाइल लंपास करणाऱ्या सराईत चाेरट्यास रायपूर पाेलिसांनी १५ डिसेंबर राेजी गजाआड केले. त्याच्याकडून एक लाख रुपये किमतीचा माेबाइल जप्त केला आहे.
रायपूर पाेलिस स्टेशनअंतर्गत असलेल्या सैलानी दर्गा येथे देशभरातून हजाराे भाविक दर्शनासाठी येत असतात, दर्गा व परिसरातील मोठ्या प्रमाणात गर्दी असते, त्या गर्दीचा फायदा घेऊन चोरटे मोबाइल व इतर वस्तू लंपास करतात, १२ डिसेंबर राेजी सादूल्ला हूसेन, मोहम्मद ताहीर अली रा. बालनगर रंगा रेड्डी आंध्र प्रदेश यांच्या खिशातून एक लाख रुपये किंमत असलेला माेबाइल चाेरट्याने लंपास केला. त्यांनी रायपूर पाेलिसांत फिर्याद दिली हाेती. रायपूर पाेलिसांनी अज्ञात चाेरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला हाेता, ठाणेदार सपोनि दुर्गेश राजपूत तसेच तपासी अंमलदार यांनी तांत्रिक मुद्याच्या आधारे तसेच गुप्त माहितीवरून आराेपीचा शाेध घेतला.
आराेपी हा बुलढाणा शहर पाेलिस स्टेशनच्या हद्दीत असल्याची माहिती मिळताच ठाणेदार राजपूत आणि बुलढाणा डीबी पिकाने पुण्यातील आरोपी सोहिल सय्यद इस्माईल याला इक्बाल चौक जवाहर नगर येथून अटक केली. त्याची चाैकशी केली असता त्याने चाेरीची कबुली दिली. तसेच त्याच्याकडून एक लाख रुपये किमतीचा ॲपल माेबाइल जप्त केला. ही कारवाई रायपूर पाेलिस स्टेशनचे राजेश गवई, आशिष काकडे, राजू गव्हाणे, अरुण झाल्टे ,राहुल जाधव, देवीदास दळवी, शेख अकतार व बुलढाणा शहर पोलिस स्टेशनच्या डीबी पथकातील उपनि दिलीप पवार, पोलिस अमलदार गजानन जाधव, युवराज शिंदे, विनोद बोरे व शिवहरी सांगडे यांनी केली. आरोपीकडून बुलढाणा जिल्ह्यातील जिल्ह्यातील मोबाइल गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, असे ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी सांगितले.