बुलडाणा जिल्ह्यात रुजतोय विषमुक्त शेतीचा प्रयोग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 11:38 AM2021-07-24T11:38:59+5:302021-07-24T11:39:05+5:30
Experiment of non-toxic agriculture : उमेद अभियानांतर्गत महिला बचत गटांनी सेंद्रिय पद्धतीच्या भाजीपाल्याची लागवड सुरू केली आहे.
- ब्रह्मानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : भाजीपाला ताजा व टवटवीत दिसण्यासाठी वेगवेगळ्या औषधांचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांकडून सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या भाजीपाल्याला मागणी वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर उमेद अभियानांतर्गत महिला बचत गटांनी सेंद्रिय पद्धतीच्या भाजीपाल्याची लागवड सुरू केली आहे. पश्चिम वऱ्हाडातही हा विषमुक्त शेतीचा प्रयोग रुजत आहे. वऱ्हाडातील तीन जिल्ह्यांत १० हजार १०० पसरबागांमध्ये सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला घेण्यात येत आहे.
कमी काळात, कमी जागेत जास्तीतजास्त उत्पादन घेण्यासाठी वेगवेगळ्या रसायनांचा वापर पिकांवर केला जात आहे. बाजारातही अशी अनेक रसायने उपलब्ध आहेत, ज्यामुळे आपले आरोग्य धोक्यात येऊ शकते. अशा रसायनांच्या माध्यमातून भाजीपाला लागवड होत असल्याने, अनेकांना केमिकलपासून उत्पादित केलेल्या भाज्या सेवन केल्यानंतर आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. परिणामी, बहुतांश ग्राहकांचा कल आता सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या भाजीपाल्याकडे वाढला आहे. सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला लागवड करण्यासाठी महिला बचत गटांनी पुढाकार घेतला आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांत १० हजार १०० पसरबागांमध्ये सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला लागवड करण्यात आली आहे. जून ते जुलै या कालावधीमध्ये ही लागवड करण्यात आलेली आहे.
वर्षभर खा विषमुक्त भाजीपाला
आपल्या परिवाराला बाराही महीने विषमुक्त ताजा भाजीपाला मिळावा, वेगवेगळ्या भाज्या नियमित आहारात मिळाव्यात, याकरिता उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाने माझी पोषण परसबाग मोहीम राबविली. त्यात बुलडाणा जिल्ह्याने दिलेले परसबागेचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. परसबागा या ग्रामीण भागात तयार करण्यात आल्या असून, त्याचा फायदा महिलांना वर्षभर होणार आहे. १२ ही महिने महिलांना त्यांच्या परिवाराला विषमुक्त, ताजा भाजीपाला आहारात देता येणार आहे.
- स्वप्निल आराख, जिल्हा व्यवस्थापक, उमेद बुलडाणा.
राज्यभर राबविली ‘माझी पोषण परसबाग’ मोहीम
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कुटुंबांच्या आरोग्य व पोषणाचा दर्जा सुधारण्यासाठी ‘माझी पोषण परसबाग विकसन’ मोहीम राज्यभर राबविण्यात आली. १५ जून ते १५ जुलै या कालावधीमध्ये उमेद सेंद्रिय पोषण परसबागा तयार करण्यात आल्या. या अभियानाला पश्चिम वऱ्हाडातही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.