मुदतबाह्य गव्हाच्या पिठाची विक्री!
By admin | Published: May 15, 2015 01:09 AM2015-05-15T01:09:04+5:302015-05-15T01:09:04+5:30
खामगाव येथील प्रकार; अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष.
खामगाव : शहरात गेल्या काही दिवसांपासून मुदतबाह्य गव्हाच्या पिठाच्या विक्रीत वाढ झाल्याचे लोकमतने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये अघडकीस आले; मात्र या प्रकाराबाबत अन्न व औषध प्रशासन अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. शहरातील काही प्रमुख दुकानांसह गल्लीबोळातील दुकानांवरून मुदतबाह्य गव्हाच्या पिठाची विक्री करून नागरिकांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार वाढीस लागला आहे. ग्राहकांच्या अज्ञानतेचा फायदा घेत, काही दुकानदार नफा कमविण्याच्या उद्देशाने मुदतबाह्य गव्हाचे पीठ विकत आहेत. शहरातील काही दुकानांमधून निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ, मुदतबाहय़ खाद्यपदार्थ व वस्तूंची विक्री भोळ्याभाबड्या ग्राहकांना केली जात असल्याची माहिती लोकमतला मिळाली होती. या माहितीची सत्यता पडताळण्यासाठी बुधवारी सकाळी आणि गुरुवारी दुपारी शहरातील यशोधरा नगर आणि बोबडे कॉलनी भागातील नामांकित किराणा दुकानामध्ये गव्हाच्या पिठाच्या पाच किलो बॅगसह काही किराणा साहित्य खरेदी करण्यात आले. यावेळी दुकानदाराने एका नामांकित कंपनीची पाच किलोची बॅग १३0 रुपयांना दिली; मात्र या बॅगची पॅकींग चक्क 0६ डिसेंबर २0१५ रोजी करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले. तर बोबडे कॉलनीतील एका दुकानातून गव्हाच्या पिठाच्या बॅगसह इतर साहित्य गुरुवारी खरेदी करण्यात आले. यावेळी दुकानदाराने पाच किलोच्या बॅगसाठी १५0 रुपये घेतले. या बॅगेची पाहणी केली असता 0२ जानेवारी २0१५ रोजी पॅकींग करण्यात आल्याचे समोर आले. विशेष म्हणजे या बॅगवर चार महिन्यांची एक्सपायरी डेट असतानाही या दुकानातून सर्रास विकल्या जात असल्याचे दुकानदाराच्या निदर्शनास आणून दिले असता, त्याने चार-पाच दिवस शिल्लक झालेले हे पीठ आणखी १५ दिवस खराब होऊ शकत नसल्याचे सांगत, बॅग परत घेण्यास चक्क नकार दिला.