'इको सायन्स पार्क'मध्ये वीज चोरीचा प्रकार उघडकीस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 02:59 PM2019-03-04T14:59:29+5:302019-03-04T15:02:57+5:30
संग्रामपूर: मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत अंबाबरवा अभयारण्यातील आदिवासी ग्राम वसाळी येथे इको सायन्स पार्क या पर्यटक प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून यात वीज चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर: मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत अंबाबरवा अभयारण्यातील आदिवासी ग्राम वसाळी येथे इको सायन्स पार्क या पर्यटक प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून यात वीज चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे नियमावर बोट ठेवून चालणारी यंत्रणा नियमबाह्य काम करीत असल्याचे उघड झाले आहे.
संग्रामपूर तालुक्यातील वसाळी येथील इको सायन्स पार्कमध्ये चोरीचा प्रकार उघडकीस आला. वीज वितरण कंपनीच्या पथकाने इको पार्क मधील वीजेची चोरी ६ डिसेंबर २०१८ रोजी पकडली. या पथकात उपकार्यकारी अभियंता एस.बी.नवलकर, सहाय्यक अभियंता राजेश राठोड, व सोनाळा वीज वितरण कार्यालयातील कनिष्ठ अभियंता एस.एम.बोदडे यांचा सहभाग होता. सदर पथकाने ईको पार्कवर धाड टाकली, तेव्हा विद्युत पोलवरून बेकायदेशीरपणे सर्व्हिस लाईनची जोडणी करण्यात आल्याचे निदर्शनास आले. सर्व्हिस लाईनचा संबंध मिटरसोबत नव्हता. विद्युत पोलवरून सर्व्हिस लाईनच्या माध्यमातून डायरेक्ट उपकरणांना विद्युत पुरवठा जोडण्यात आल्याने बेकायदेशीरपणे विजेचा वापर करण्यात येत होता. वीज वितरण कंपनीकडून पकडण्यात आलेली वीजचोरी ही सर्वसामान्य नागरिकांकडून नाही, तर कायद्याच्या अधीन राहून काम करणाऱ्या शासकीय यंत्रणेच्या प्रकल्पात पकडण्यात आली होती. यात २ हजार ९८२ युनिट वीजचोरीचा ठपका वीज वितरण कंपनीकडून ठेवण्यात आला. वीज चोरीपोटी ७४ हजार ४८४ रुपये रक्कम आकारण्यात आली. त्यावर २० हजार रुपये दंड असे ९४ हजार ४०० रुपये आकारण्यात आले. ११ जानेवारी रोजी दंडाचा भरणा अमेय कंट्रक्शन कंपनीकडून आरटीजीएसच्या माध्यमातून भरण्यात आल्याचे वन्यजीव विभागाने सांगितले आहे. त्यामुळे ठेकेदारानेच वीज चोरी केल्याचे दंड भरल्यावरून स्पष्ट होते. (प्रतिनिधी)
थकीत बील भरणार कोण?
विज चोरी व्यतिरिक्त येथे करण्यात आलेल्या बहुतांश कामांमध्ये ठेकेदाराकडून गौडबंगाल तर करण्यात आले नाही ना, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे. येथे ६२ हजार ८२४ युनिटचे ८ लाख ६६ हजार रूपये बिल थकित असल्याने वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केला. एवढ्या मोठ्या रक्कमेचा भरणा कोण करेल, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. ठेकेदाराच्या कारनाम्याची शिक्षा मात्र वन्यजीव विभागाला भोगावी लागत आहे.
इको पार्कमध्ये वीजचोरी करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. युनिटप्रमाणे वन्यजीव विभागाला बिल आकारण्यात आले असून दंडाच्या रकमेसह वसुली करण्यात आली आहे.
- एस. एम. बोदडे
कनिष्ठ अभियंता सोनाळा