महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्यास मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:28 AM2021-01-02T04:28:41+5:302021-01-02T04:28:41+5:30
कृषी विभागाने आता महा-डीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने ...
कृषी विभागाने आता महा-डीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीयप्रणाली विकसित केलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला वैयक्तिक मोबाइल क्रमांक आपल्या आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. महा-डीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर अर्ज सादर करण्यासाठी १० जानेवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकरी स्वतःच्या मोबाइल, संगणक/लॅपटॅाप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (सीएससी), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र आदींच्या माध्यमातून उक्त संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक संकेतस्थळावर प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे. ज्या वापरकर्त्यांकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी, नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येतो. अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल. त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही. पोर्टलवरील प्राप्त अर्जांची ऑनलाइन लॉटरी, पूर्व संमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे आदी सर्वप्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टलवर कृषिविषयक योजनाचा लाभ मिळविण्यासाठी अद्याप अर्ज केला नसेल, त्यांनी १० जानेवारीअखेर आपले अर्ज पोर्टलवर भरावेत. या तारखेपर्यंत प्राप्त सर्व अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.