महाआवास अभियानाला पुन्हा मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:56 AM2021-05-05T04:56:09+5:302021-05-05T04:56:09+5:30
बुलडाणा : ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचा निवारा देणाऱ्या विविध योजना गतिमान करून घरकुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी राज्यात ‘महाआवास अभियान, ...
बुलडाणा : ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचा निवारा देणाऱ्या विविध योजना गतिमान करून घरकुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी राज्यात ‘महाआवास अभियान, ग्रामीण’ राबविण्यात येत आहे. या अभियानाला ५ जून २०२१पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याविषयीचा शासन आदेश ३ मे राेजी जारी करण्यात आला आहे. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), रमाई आवास, शबरी आवास, पारधी आवास, आदीम आवास, अटल बांधकाम कामगार आवास, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, पंडित दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसाह्य योजना, ग्रामीण भागातील शासकीय जागांवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठीची योजना यामधून ग्रामीण नागरिकांना घरकुलांचा लाभ देण्यात येत आहे. यापैकी अनेक लाभार्थ्यांची घरकुले विविध कारणांनी रखडली हाेती़, या रखडलेल्या घरकुलांना गती देण्यासाठी घरकुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी राज्यात २० नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी २०२१ या काळात ‘महाआवास अभियान, ग्रामीण’ राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला हाेता. त्यानंतर या अभियानाला १ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली हाेती. प्रशासकीय कारणास्तव या अभियानाला पुन:श्च मुदतवाढ देण्यात येत असून, हे अभियान ५ जूनपर्यंत राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. याविषयी ग्रामविकास विभागाच्यावतीने शासन आदेश जारी करण्यात आला आहे.