मुलांच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रंगवतानाच मिटले डोळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:45 AM2021-06-16T04:45:52+5:302021-06-16T04:45:52+5:30
महारचिकना (बुलडाणा) : मुलांच्या ‘नीट’ क्लासचे पैसे भरून त्यांच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रंगवत असतानाच, चार पालकांवर काळाने घाला ...
महारचिकना (बुलडाणा) : मुलांच्या ‘नीट’ क्लासचे पैसे भरून त्यांच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रंगवत असतानाच, चार पालकांवर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना हिंगोली जिल्ह्यातील सिनगावनजीक घडली.
लोणार तालुक्यातील काही पालक आपल्या मुलांना नीट परीक्षेसाठी क्लास लावण्यासाठी नांदेडला गेले होते. यामध्ये एका शिक्षकासह तीन शेतकरी पित्यांचा समावेश आहे. काेराेनामुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने पालकांना आपल्या मुलांच्या शैक्षणिक भवितव्याची चिंता सतावत आहे. लाेणार तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांची मुले नीट परीक्षा उत्तीर्ण हाेऊन डाॅक्टर, अभियंते व्हावीत, अशी स्वप्ने पाहिली. मात्र, नियतीच्या मनात वेगळेच हाेते. या चारही पालकांचा हिंगाेली जिल्ह्यातील सेनगावजवळ झालेल्या कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
जिल्हा परिषद शाळेत गत दहा वर्षापासून कार्यरत असलेले खळेगाव येथील गजानन अंकुशराव सानप यांनी परिसरातील शेतकऱ्यांसह मुलांची ‘नीट’ची शिकवणी नांदेड येथील खासगी क्लासमध्ये लावली. या शिकवणीचे पैसे भरण्यासाठी गजानन सानप यांच्यासह बबन संजीकराव थोरव, प्रकाश साहेबराव सोनुने व विजय परसराम ठाकरे कारने रविवारी नांदेड येथे गेले हाेते. तेथून परत येत असताना पुलाचे बांधकाम करण्यासाठी खाेदलेल्या खडड्यात त्यांची कार काेसळली. कारची सर्वच दारे लाॅक झाल्याने चाैघांचाही गुदमरून मृत्यू झाला.
१० वर्षांपासून शिक्षक
खळेगाव येथील गजानन सानप हे जालना जिल्ह्यातील वझर सरकटे येथे शिक्षक म्हणून कार्यरत हाेते. विद्यार्थ्यांमध्ये ते प्रिय हाेते. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंंबावर दु:खाचा डाेंगर काेसळला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा आप्त परिवार आहे.
विहिरीच्या बांधकामासाठी प्रसिद्ध
हिंगाेली जिल्ह्यातील सेनगाव येथे झालेल्या अपघातात बबन संजीकराव थाेरवे यांचाही मृत्यू झाला. विहिरीच्या बांधकामासाठी ते प्रसिद्ध हाेते. तालुकाभरात त्यांनी अनेक विहिरींचे बांधकाम केले. त्यामुळे ते सर्वांच्या परिचयाचे हाेते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परिवार आहे.
विजय ठाकरे रा. धानोरा तालुका लोणार हे सध्या मेहेकर येथे राहत हाेते. त्यांच्या मुलाचे वैद्यकीय शिक्षण झाले आहे. तसेच मुलीचा शिकवणी वर्ग लावण्यासाठी ते नांदेड येथे गेले होते. अल्पभूधारक असलेल्या प्रकाश सोनुने यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा आप्त परिवार आहे.