धान्याची उचल मिळेना, तांदळाची टंचाई; पुरवठा विभाग मेटाकुटीला!
By अनिल गवई | Published: March 4, 2024 05:53 PM2024-03-04T17:53:48+5:302024-03-04T17:54:33+5:30
खामगाव आणि वाशिम येथील गोदामातून उचल देणे बंद असल्यामुळे अकोला येथील गोदामावर ताण वाढत आहे.
खामगाव: अकोला येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या (सीडब्ल्यूसी गोदाम ) क्रमांक १ आणि २ येथून धान्य उचलीसाठी येणार्या अडचणींमुळे बुलढाणा जिल्ह्यातील धान्य वाहतूक आणि वितरण प्रणाली संकटात सापडली आहे. याबाबत पुरवठा विभागाकडून वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही वेळेवर धान्याची उचल मिळत नाही. परिणामी, बुलढाणा जिल्ह्यात तांदळाची टंचाई जाणवत असल्याचे चित्र आहे. त्याचवेळी गव्हाचाही अत्यल्प पुरवठा होत असल्याने, पुरवठा विभाग मेटाकुटीस आल्याची चर्चा आहे.
प्राप्त माहितीनुसार, अकोला येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदाम क्रमांक १ आणि २ अमरावती, अकोला, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेच्या तांदूळ आणि गव्हाची उचल दिल्या जाते. खामगाव आणि वाशिम येथील गोदामातून उचल देणे बंद असल्यामुळे अकोला येथील गोदामावर ताण वाढत आहे. परिणामी, बुलढाणा जिल्ह्यातील उचल प्रभावित झाली असून, फेब्रुवारी महिन्यात केवळ १६ दिवस उचल देण्यात आली. परिणामी, बुलडाणा जिल्ह्यातील धान्य वाहतूक आणि वितरण प्रणाली प्रभावित झाल्याने, जिल्हा पुरवठाविभागाकडून अकोला येथील केंद्रीय वखार महामंडळ व्यवस्थापनाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. यात अधिकाअधिक वाहने भरून धान्य उचल देण्याची मागणी करण्यात आली. तसेच सुटीच्या दिवशीही साठा अधिक्षक यांना आपल्या स्तरावरून उचल देण्याचे सुचविण्यात आले. मात्र, तरी देखील बुलढाणा जिल्ह्यातील धान्य उचल बाबत केंद्रीय वखार महामंडळाकडून दिरंगाई केली जात असल्याची ओरड आता होत आहे.
फेब्रुवारीचेही वितरण प्रलंबित
अकोला येथील दोन्ही गोदामातून धान्य उचल मिळत नसल्याने बुलढाणा जिल्ह्यातील अनेक तालुक्यात फेब्रुवारीचेही वितरण प्रलंबित आहे. तर मेहकर व लोणार तालुक्यातील शासकीय गोदामातून रास्तभाव दुकानदारांना तांदळाचे वाटप करणे प्रलंबित असल्याची माहिती आहे.
केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामामध्ये साठा नसल्याने धान्याची उचल देण्यास िवलंब होत आहे. धान्य उचलबाबत आपल्याकडील जिल्हा पुरवठा विभागालाच विचारा. आपण उत्तर देण्यास बांधिल नाही.
नितिश नाईक, गोदाम व्यवस्थापक, सीडब्लूसी गोदाम क्रंमांक १ अकोला.
वखार महामंडळाच्या गोदामावर एकाच वेळी ताण वाढला आहे. त्यामुळे उचल देताना तांत्रिक अडचण येत आहे. तरी, सोमवारपासून बुलडाणा जिल्ह्यातील धान्याची उचल नियमित दिली जाईल.
ज्योती बुरडे, विभागीय व्यवस्थापक केंद्रीय वखार महामंडळ, अमरावती.