२.९२ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 01:53 PM2020-01-21T13:53:18+5:302020-01-21T13:53:29+5:30
पोलिसांनी २ लाख ९२ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करून दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मोताळा : दोन हजार रुपयांच्या १४६ बनावट नोटा घेऊन येणाऱ्या दोघांना बोराखेडी पोलिसांनी मोताळा-मलकापूर मार्गावरील नळगंगा फाट्यानजीक शिताफीने पकडले. ही कारवाई सोमवारी पहाटे दोन ते चार वाजताच्या दरम्यान केली. पोलिसांनी २ लाख ९२ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करून दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
राजेंद्र सदाशिव बोरले (५५, रा. जहांगीरपूर ता. मोताळा) व नामदेव फुलसिंग चव्हाण (४५, रा. मोरखेड ता. मलकापूर) हे दोघे जण भारतीय चलनातील बनावट नोटा घेऊन दुचाकीने मलकापूरकडून मोताळ्याकडे येत होते. बनावट नोटांची गुप्त माहिती बोराखेडी पोलिसांना मिळाली होती. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक अशोक रोकडे, पोलीस हेड काँस्टेबल नंदकिशोर धांडे, पोलीस काँस्टेबल संजय गोरे, चालक समीर शेख यांनी सोमवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास मोताळा-मलकापूर मार्गावरील नळगंगा फाट्यानजीक नाकाबंदी केली. यावेळी राजेंद्र सदाशिव बोरले व नामदेव फुलसिंग चव्हाण हे दोघे जण दोन दुचाकीवर मोताळ्याकडे येताना दिसले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता, त्यांच्या ताब्यात दोन हजार रुपयांच्या १४६ बनावट नोटा मिळून आल्या. या नोटांचे दर्शनी मूल्य २ लाख ९२ हजार आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून बनावट नोटा, दोन दुचाकी व तीन मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील एका दुचाकीला समोरील बाजूस वेगळी व मागील बाजूस वेगळी अशा दोन नंबर प्लेट आहेत. बोराखेडी पोलिसांनी या दोन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली. आरोपी राजेंद्र बोरले याच्याविरुद्ध मलकापूर शहर व पुणे येथे यापूर्वी बनावट नोटांसंदर्भात गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे.