नामवंत वादकांचा तबला घडविण्याचे ‘कसब’ खामगावात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 04:17 PM2019-02-10T16:17:53+5:302019-02-10T16:18:49+5:30

एकेकाळी त्यांचा तबला घडविण्यासाठी जे हात मुंबईत राबायचे, तेच हात खामगाव परिसरातील तबले घडवताहेत. सगट बंधूंचे हे कसब सध्या खामगाव परिसरातील संगीतप्रेमी अनुभवत आहेत.

famous musical tabla made in khamgaon |  नामवंत वादकांचा तबला घडविण्याचे ‘कसब’ खामगावात!

 नामवंत वादकांचा तबला घडविण्याचे ‘कसब’ खामगावात!

Next

- देवेंद्र ठाकरे
खामगाव : उस्ताद झाकीर हुसेन! तबला-वादन क्षेत्रातील एक जागतिक ख्यातीचं नाव. त्यांचा चेहरा समोर आला, की तबल्यावर नुसती भिंगरीसारखी फिरणारी बोटं आणि त्यातून निघणारा गोड आवाज, हे दृश्य समोर आल्याशिवाय राहत नाही. उस्ताद झाकीर हुसेन यांच्या बोटांमध्ये जरी जादू असली, त्याला साथ आहे, तबला घडविणाऱ्या हातांची. एकेकाळी त्यांचा तबला घडविण्यासाठी जे हात मुंबईत राबायचे, तेच हात खामगाव परिसरातील तबले घडवताहेत. सगट बंधूंचे हे कसब सध्या खामगाव परिसरातील संगीतप्रेमी अनुभवत आहेत.
गजानन सगट आणि जीवन सगट ही ती जोडी आहे. सगट बंधूंचे मूळ गाव चिखली तालुक्यातील गांगलगाव.
सगट घराण्याची खरी ओळखच तबले घडविण्यामुळे निर्माण झाली. नारायण सगट, पुंडलिक सगट, मधुकर सगट आणि त्यानंतर गजानन व जीवन सगट ही चौथी पिढी तबल्याला बोलकं करण्याचं काम करीत आहेत. तबला बनविण्याचे कसब घरातच असल्याने साहजिकच हे दोघांमध्येही हा ‘हुन्नर’ उतरला. लहानपणापासूनच तबला तयार करण्याची किमया त्यांनी शिकली. यात अजून प्रगती झाली, ती मुंबई येथे व्हटकर गुरुजी यांच्याकडून धडे घेतल्यानंतर. परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे १९९६ साली सगट बंधूंची जोडी मुंबईत दाखल झाली. तिथे गुरुवर्य हरिदास व्हटकर यांच्याकडून त्यांनी हा गुण आणखी विकसित केला. त्या काळात उस्ताद झाकीर हुसेन, पंडित सुरेश तळवलकर, योगेश शम्सी, पंडित आनींदो चटर्जी यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय कलावंताचे तबले घडविण्याची संधी त्यांना मिळाली. अर्थात, यात व्हटकर गुरुजींचेच श्रेय असल्याचे ते सांगतात. काही वर्षे मुंबईत काढल्यानंतर व्हटकर गुरुजींनी स्वतंत्रपणे हे काम करण्याचे सांगितले. ‘तबला घडविण्यात तुम्ही यशस्वी झाला आहात, आता अधिक शिकण्याची गरज नाही’, असा गुरुजींचा आशीर्वाद घेऊन ते खामगावात आले. येथे सुरुवातीला खविसंच्या जागेत विनाभाडेतत्त्वावर त्यांनी सहा वर्षे काम केले. चर्मवाद्याला बोलके करण्याची मेहनत, लगन, उपासना त्यांच्यात असल्याने त्यांच्या हातून घडलेला तबला दूरवर घुमू लागला. तबल्याचे ट्युनिंग महत्त्वाचे असते. त्यावर खूप मेहनत घ्यावी लागते. रक्ताचे पाणी केल्याशिवाय तबला बोलका होत नाही. चाट आणि लव यांचा योग्य मेळ बसला की खरा आनंद येतो. उच्च दर्जाचे साहित्य आणि पुडी बनविताना कुठल्याच गोष्टीची तडजोड आम्ही स्वीकारत नाही, असे सगट बंधू सांगतात. त्यांच्या या मेहनतीमुळेच महाराष्ट्र, मध्य प्रदेश तसेच इतरही प्रांतातूनही तबले बनविण्यासाठी त्यांच्याकडे येतात. निव्वळ पैसा कमविणे, हा हेतू नसून ग्राहकांचे समाधान अधिक महत्त्वाचे असल्याने उत्तम खाल, शाई त्यासाठी वापरत असल्याचे सगट सांगतात. एकूण सगट काका-पुतणे जीव ओतून काम करतात आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे झाकीर हुसेन यांच्या तबल्यासारखा बोल काढणारा तबला बनविण्याचा हुन्नर त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांची एक वेगळी ओळख बुलडाण्यात बनली आहे.

 

Web Title: famous musical tabla made in khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.