मोक्याच्या जागांवरील झाडे असुरक्षित !
By admin | Published: May 17, 2017 01:30 AM2017-05-17T01:30:47+5:302017-05-17T01:30:47+5:30
झाडाच्या बुंध्यांना आग लावून केले जाते मैदान मोकळे
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: पर्यावरण रक्षणासाठी मोलाची भूमिका अदा करणारी झाडे खामगाव शहरात असुरक्षित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. शहरातील काही मोक्याच्या जागांसह खुल्या मैदानांतील झाडांनाही आता लक्ष्य केल्या जात असल्याची वस्तुस्थिती ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आली आहे.
वाढत्या महागाईमुळे दिवसेंदिवस प्लॉटच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. अशातच शहरातील मोक्याच्या जागेच्या वापरासाठी या जागांवर असलेली झाडे जमीनदोस्त करण्याचा सपाटा काही असामाजिक तत्त्वांकडून लावल्या जात आहे. वृक्षसंवर्धन करण्याऐवजी आहेत त्याच वृक्षांना तोडण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, एखाद्या हिरव्यागार वृक्षावर एकाच वेळी घाव न घालता, या झाडाच्या बुंध्याला आग लावून सदर झाडाचे खोड कमकुवत करण्यात येते. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने झाडांची कत्तल करण्यात येत असून, शहरातील वामन नगर भागातील वृक्षाला याच पद्धतीने लक्ष केल्या जात आहे. या झाडाच्या बुंध्याशेजारी परिसरातील एका विशिष्ट व्यक्तीकडून आग लावली जात आहे. दरम्यान, काही नागरिकांनी ही आग विझविल्यानंतरही संबंधितांकडून वारंवार या हिरव्यागार झाडाच्या बुंध्याला आग लावल्या जात असल्याने, शहरातील हिरवीगार झाडे सुरक्षित नसल्याचा प्रत्यय शहरवासीयांना येत आहे. वामन नगरातील एका झाडासोबतच यशोधरा नगरातील एका वडाच्या झाडालाही गेल्या काही दिवसांपूर्वीच लक्ष करण्यात आले होते. त्याचप्रमाणे खुल्या मैदानातील झाडांच्या बुंध्याला आग लावली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
जागेच्या वापरासाठी झाडांचा बळी!
घराशेजारील मैदान अथवा मोक्याच्या जागेचा वापर करण्यासाठी हिरव्यागार वृक्षांचा बळी दिला जात आहे. उच्चभू्र वस्तीत प्रामुख्याने असे प्रकार घडत असले, तरी सामान्य वस्तीमधील नागरिक जळतानासाठी या झाडांचा बळी देत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
सामाजिक संस्थांचे दुर्लक्ष!
शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जात असताना सामाजिक संस्थांची चुप्पी चर्चेचा विषय बनली आहे. वृक्ष लागवडीसाठी झटणाऱ्या संस्थांकडून शहरातील झाडांची दखल घेणे अपेक्षित आहे; मात्र शासकीय कार्यालयांप्रमाणेच इतर सामाजिक संघटनाही याकडे दुर्लक्ष करीत आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांचीही याकडे डोळे झाक असल्याने, वृक्षतोडीस या संस्था तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची मूक संमती तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरात काही भागात वृक्षतोड केल्या जात असल्याची माहिती आपणास प्राप्त झाली आहे. शासनाकडून वृक्ष जगविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे वृक्षतोड करणाऱ्यांची कोणतीही गय पालिका प्रशासनाकडून करण्यात येणार नाही.
- मनोज पवार, वृक्ष प्राधिकरण अधिकारी नगर परिषद खामगाव.
नवीन झाडे लावण्याऐवजी असलेली झाडे जमीनदोस्त करण्याचा प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. वृक्षतोड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे परिसरातील झाडांचे सुव्यवस्थित संगोपन करण्यााठी वृक्ष समित्यांचे गठन आवश्यक आहे.
- संजय गुरव, वृक्षप्रेमी.