शेतरस्त्याचे काम थंडबस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:32 AM2021-04-15T04:32:23+5:302021-04-15T04:32:23+5:30
देऊळगाव कुंडपाळ : पालकमंत्री पांदण शेतरस्ता योजनेअंतर्गत देऊळगाव कुंडपाळ ते गायरान या चार किमी रस्त्याचे काम थंडबस्त्यात ...
देऊळगाव कुंडपाळ : पालकमंत्री पांदण शेतरस्ता योजनेअंतर्गत देऊळगाव कुंडपाळ ते गायरान या चार किमी रस्त्याचे काम थंडबस्त्यात पडले आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम लवकर सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
गावच्या हद्दीतील प्रमुख असलेला गायरान शेतरस्ता पालकमंत्री पांदण शेतरस्ता योजनेअंतर्गत करण्यासाठी शेतकऱ्यांनी तहसीलदाराकडे मागणी केली होती. त्यानुसार तहसीलदार सैफन नदाफ यांनी २२ नाेव्हेंबर २०२० राेजी स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेऊन मार्गदर्शन केले होते. त्यानुसार तत्कालीन तलाठी संतोष जाधव यांच्या पुढाकारातून गावातील ११० शेतकऱ्यांनी लोकसहभागातून शेत रस्ता सुरू करण्यास संमती देऊन रस्त्याचे काम हाती घेतले होते. साडेतीन किलोमीटरपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा नाली काम केलेले आहे. तसेच सदर शेत रस्त्यावर दहा ठिकाणी लागणारे वीस सिमेंट पाईप लोकसहभागातून खरेदी केले आहेत. तसेच या रस्त्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी स्वतःहून आपल्या जमिनी दान केल्या आहेत. उभ्या पिकातून
रस्ता देऊनसुद्धा अनेकांनी रस्त्यासाठी पुढाकार घेत नियमाप्रमाणे ३३ फुटांचा शेत रस्ता कामात मदत केली आहे.
परंतु, गावाजवळील पांदण रस्त्यावरील अतिक्रमण करणाऱ्या पाच शेतकऱ्यांनी या कामास अडथळा निर्माण केला आहे. त्यामुळे रस्त्याचे काम थंडबस्त्यात पडले आहे.
त्यामुळे ११० शेतकर्यांनी श्रमदानातून केलेले व लोकसहभागातून केलेल्या या शेतरस्त्याच्या कामावर विपरीत परिणाम होत आहे. पेरणीचे दिवस समोर येत असल्याने तहसीलदारांनी या प्रकरणी प्रत्यक्ष लक्ष देऊन रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रती पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी बुलडाणा यांनाही निवेदन दिले आहे. या निवेदनावर समाधान गाढवे, अर्जुन आडे, संदीप राठोड, शिवाजी सरकटे, संजय सरकटे, जनार्दन सरकटे, भागवत सरकटे, रवी सरकटे, गजानन सरकटे, विठ्ठल सरकटे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची स्वाक्षरी आहे.