शेतात नांगरणी करताना वीजेचा धक्का लागल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू; खामगाव तालुक्यातील पिंप्राळा येथील घटना
By अनिल गवई | Published: June 16, 2023 12:34 PM2023-06-16T12:34:00+5:302023-06-16T12:35:16+5:30
घटनेनंतर घटनास्थळी दाखल झालेल्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्याला संतप्त जमावाने मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे.
अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव: शेतात नांगरटी करण्यास गेलेल्या एका ३२ वर्षीय शेतकर्याचा वीजेचा धक्का लागल्याने जागीच दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता दरम्यान खामगाव तालुक्यातील पिंप्राळा येथे उघडकीस आली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून, घटनेनंतर घटनास्थळी दाखल झालेल्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्याला संतप्त जमावाने मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे.
खामगाव तालुक्यातील पिंप्राळा येथील ३२ वर्षीय शेतकरी श्रीधर दयाराम पटोकार शुक्रवारी पहाटे नांगरटी करण्यासाठी गेले. नांगरटी करताना शेतात पडलेल्या विद्युत खांबावरील तारेचा स्पर्श झाल्याने पटोकार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गत तीन दिवसांपूर्वी आलेल्या वादळी वार्यात पिंप्राळा परिसरात काही ठिकाणी विजेचे खांब कोसळले होते. या खांबावरील विद्युत तारेत जिवंत प्रवाह असल्याची तक्रार ग्रामस्थांनी दोन दिवसांपूर्वीच वीज वितरण कंपनीकडे केली होती. मात्र, तरीही वीज तारांची दुरूस्ती तसेच प्रवाह बंद न करण्यात आल्यानेच युवा शेतकर्याचा मृत्यू झाला. अशी संतप्त भावना ग्रामस्थांनी घटनास्थळी मांडली.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वीज वितरण कंपनीचा एक कर्मचारीही तेथे पोहोचला. त्यावेळी या कर्मचार्याला ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. काही संतप्त ग्रामस्थांनी या कर्मचार्याला मारहाण केल्याचेही वृत्त समोर येत आहे. याप्रकरणी प्रत्येक हालचालीवर ग्रामीण पेालीस लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, पंचनामा करून मृतक शेतकर्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खामगाव येथील सामान्य रूग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.