कृषीपंप सरकविण्यासाठी गेलेल्या शेतकरी पिता-पुत्राचा शॉक लागून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 12:13 PM2020-05-17T12:13:26+5:302020-05-17T12:17:20+5:30
कृषीपंप बॅकवाटर जवळ नेण्याचा प्रयत्न करीत असताना अचानक वीज आली व त्याचा प्रवाह पाण्यात उतरल्याने या बाप-लेकांचा जागीच मृत्यू झाला.
लोणार : तालुक्यातील हिरडव येथील बापलेकाचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना १७ मे रोजी पहाटे सहाच्या सुमारास घडली. हिरडव लगत असलेल्या तलावावर शेती सिंचनासाठी लावण्यात आलेला कृषीपंप थोडा मागे सरकविण्यासाठी पहाटे ते गेले असता ही दुर्देवी घटना घडली.
हिरडव लगत एक तलाव असून या तलावातील बॅक वॉटरचा शेती सिंचनासाठी या परिसरातील नागरिक उपयोग करतात. मात्र उन्हाळा असल्याने व पाण्याचा तलावातून उपसा होत असल्याने तलावातील पाणी कमी होत आहे. त्यामुळे बॅकवॉटरही कमी होत होेते. परिणामी शेतीला पाणी देण्यात अडचण येत असल्याने पहाटेच हिरडव येथील जनार्दन निवृत्ती मैराळ (५०) आणि त्यांचा मुलगा नीलेश जनार्दन मैराळ (३४) हे तलावावर गेले होते. पहाटे त्यांचा कृषीपंप बॅकवाटर जवळ नेण्याचा प्रयत्न करीत असताना अचानक वीज आली व त्याचा प्रवाह पाण्यात उतरल्याने या बाप-लेकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
हा प्रकार या भागात पहाटे अशाच कामासाठी आलेल्या काही शेतकºयांच्या निदर्शनास आला व मग धावपळ सुरू झाली. दरम्यान, सकाळी साडेदहाच्या सुमारास पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पाण्यात पडलेले दोघा बापलेकांचे मृतदेह बाहेर काढण्यास त्यांनी प्रारंभ केला होता. सोबतच घटनेचाही पंचनामा हे पोलिस करीत आहेत.
वेळे आधीच वीज आल्याने झाला घात?
हिरडव परिसरात साधारणत: पहाटे सात वाजेच्या सुमारास वीज येते. त्यानुषंगाने त्यापूर्वी शेतात जावून कृषी पंप तलावाच्या बॅकवाटर लगत हलविण्यासाठी हे दोघे गेले होते. मात्र नेमकी १७ मे रोजी वीज वेळे आधी आली आणि वीजेचा प्रवाह अचानक पाण्यात आला. त्यातच या शेतकरी पिता-पुत्राचा दुर्देवी मृत्यू झाल्याची चर्चा सध्या घटनास्थळी असलेल्या शेतकरी व नागरिकांमध्ये आहे.