‘कोरोना’ आपत्तीत बळीराजाची लूट : शंभर रूपयांच्या स्टॅम्पसाठी २०० रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 10:31 AM2020-06-24T10:31:26+5:302020-06-24T10:32:01+5:30
पाचशे रूपयांचा स्टॅम्पपेपरही अव्वाच्या सव्वाभावाने खरेदी करावा लागत असल्याचे दिसून येते.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शेतकऱ्यांना पिक कर्जासाठी आवश्यक असलेले शंभर रुपयांचे स्टॅम्प पेपर खामगावात उपलब्ध नाहीत. त्याचवेळी अतिरिक्त पैसे मोजल्यास शंभर रूपयांचा स्टॅम्प तात्काळ उपलब्ध होत असल्याचा प्रकार ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आला. शंभर रूपयांऐवजी अनेक शेतकऱ्यांना नाईलाजास्तव पाचशे रूपयांचा स्टॅम्पपेपरही अव्वाच्या सव्वाभावाने खरेदी करावा लागत असल्याचे दिसून येते.
काही शेतकºयांच्या पेरण्याही आटोपल्या आहेत. दरम्यान, पीककर्ज, कोणत्याही बँकेचे कर्ज नसल्याचे पत्र, तसेच इतर कर्जासाठी बँकाना प्रतिज्ञालेख देण्यासाठी स्टॅम्प पेपरची आवश्यक आहे. मात्र, खामगाव येथे गत काही दिवसांपासून १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला आहे. काही मुद्रांक विक्रेत्यांनी शंभर रूपयांचा स्टॅम्प उपलब्ध नसल्याचे फलक लावले आहे. मात्र, शंभर रूपयांच्या स्टॅम्प पेपरसाठी अतिरिक्त पैसे मोजल्यास तात्काळ स्पॅम्प उपलब्ध होत आहे. त्याचवेळी शेतकºयांनी निकड लक्षात घेत, काही मुद्रांक विक्रेते शेतकºयांना ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरचीही विक्री करीत आहेत. ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरचीही चढ्या भावाने विक्री होत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस आले. दुय्यम निबंधक आणि महसूल प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसते.
असे केले स्टिंग आॅपरेशन!
खामगावात स्टॅम्प पेपरचा कृत्रिम तुटवडा तसेच चढ्या भावाने स्टॅम्प पेपरची विक्री होत असल्याचे निर्दशनास आले. त्यानंतर ‘लोकमत’ने एका वार्ताहरास शेतकरी म्हणून स्टॅम्प पेपर घेण्यास पाठविले. त्यावेळी सुरूवातीला स्टॅम्पपेपर उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. शंभर रूपयांचा स्टॅम्प शेगाव येथे उपलब्ध असल्याचे विक्रेत्याने सांगितले. त्यावेळी काही शिल्लक रक्कम देण्याची तयारी दर्शविल्यानंतर तात्काळ १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर उपलब्ध झाला.
शंभर रूपयांच्या स्टॅम्प पेपरचा कृत्रिम तुटवडा तसेच चढ्या भावाने विक्री केल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यासंदर्भात नायब तहसीलदारांमार्फत चौकशी तसेच तपासणी केली जाईल. संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
- शितल रसाळ
तहसीलदार, खामगाव.
सुरूवातीला स्टॅम्प पेपर उपलब्ध नसल्याचे सांगितल्या जाते. अतिरिक्त पैसे देण्यास तयार झाल्यास ताबडतोब स्टॅम्प उपलब्ध केल्या जातो. आपल्याकडून शंभर रूपयांच्या स्टॅम्पसाठी २०० रुपये घेण्यात आले.
- अनिल आखरे, शेतकरी, बोरीअडगाव ता. खामगाव.