शेतकरी आत्महत्यांचे खापर फोडले घरगुती कलहावर!

By admin | Published: March 30, 2017 02:36 AM2017-03-30T02:36:17+5:302017-03-30T02:36:17+5:30

बुलडाणा जिल्हा प्रशासनाने तयार केला शेतकरी आत्महत्यांचा अहवाल

Farmer suicides in the house! | शेतकरी आत्महत्यांचे खापर फोडले घरगुती कलहावर!

शेतकरी आत्महत्यांचे खापर फोडले घरगुती कलहावर!

Next

नीलेश शहाकार
बुलडाणा, दि. २९- शेतकरी आत्महत्यांचे खापर घरगुती कलहावर फोडण्यात आले आहे. बहुतांश शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे कारण शेतकर्‍यांवरील कृषी कर्जाचा बोझ्या तथा सिंचन सुविधेचा अभाव दाखविण्यात आला नसून, या आत्महत्यांमागे कौटुंबिक कलह असल्याचा अहवाल शासनाला सादर केला आहे.
जिल्हा प्रशासनाने शेतकरी आत्महत्यांचा अहवाल तयार केला आहे. यामध्ये आजपर्यंंत जिल्ह्यात २१३८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, त्यापैकी ९७८ प्रकरण मदतीसाठी पात्र ठरले आहेत. तसेच जिल्ह्यात सर्वात जास्त ५६७ शेतकर्‍यांनी घरगुती कलहातून आत्महत्या केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. मात्र, गत दहा वर्षांंत लागोपाठ जिल्ह्याला दुष्काळाच्या छळा सोसाव्या लागल्या. सततची नापिकी व वाढणारे कर्ज यामुळे आर्थिक विवंचनेतून शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपविली. मार्च २0१७ पर्यंंत जिल्ह्यातील नापिकीमुळे ३0१ आत्महत्या आणि ६७८ आत्महत्या कर्जबाजारीपणामुळे असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना मदत देण्यात आली. मात्र, शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा सध्याचा चिंतेचा विषय असला, तरी कर्जबाजारीपणा व्यतिरिक्त अपयश, अपमान, नैराश्य, कौटुंबिक कलह, व्यसनाधिनता आदी किरकोळ कारणेही आत्महत्येसाठी कारणीभूत असल्याचे प्रशासकीय अहवालात नमूद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांच्या १९0 प्रकरणावर व्यसनाधिनता व ५६७ प्रकरणांवर घरगुती कलहचा ठपका प्रशासनाकडून ठेवण्यात आला आहे.

११४0 आत्महत्या प्रकरणं अपात्र
मार्च २0१७ पर्यंंत जिल्ह्यात २१३८ शेतकर्‍यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली. यापैकी केवळ ९७८ प्रकरणं पात्र ठरवून त्यांना शासनाकडून मदत प्राप्त झाली, तर ११४0 आत्महत्या प्रकरणं विविध कारणांमुळे अपात्र ठरविण्यात आली.

तीन महिन्यांत ७७ आत्महत्या
नोटाबंदीच्या निर्णयानंतर शेतकरी आणखीनच उद्ध्वस्त झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे जानेवारी ते मार्च २0१७ या तीन महिन्याच्या काळात जिल्ह्यात ७७ शेतकरी आत्महत्यांची नोंद आहे. यात जानेवारीमध्ये ३१, फेब्रुवारीमध्ये ३१ आणि मार्चमध्ये १५ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. यात २१ प्रकरणांत मदत देण्यात आली असून, ३७ प्रकरणं अपात्र ठरविण्यात आली आहे,. तर १९ प्रकरणं अद्यापही प्रलंबित आहेत.

शेतकरी आत्महत्यांचा आलेख
एकूण आत्महत्या    २१३८
पात्र प्रकरण              ९७८
अपात्र प्रकरण         ११४0
प्रलंबित प्रकरण          २0
आजारपणामुळे        २६0
व्यसनाधिनता         १९0
अपघात                    २१
बेरोजगारी                ६६
नैसर्गिक आपत्ती      ३९
घरगुती भांडण         ५६७

Web Title: Farmer suicides in the house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.