शेतकऱ्याने घेतले एकरी १२ क्विंटल गव्हाचे उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:34 AM2021-04-01T04:34:43+5:302021-04-01T04:34:43+5:30
अशोक इंगळे साखरखेर्डा : पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनच्या माध्यमातून येथील एका शेतकऱ्याने एकरी १२ क्विंटल गव्हाचे उत्पादन घेऊन ...
अशोक इंगळे
साखरखेर्डा : पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनच्या माध्यमातून येथील एका शेतकऱ्याने एकरी १२ क्विंटल गव्हाचे उत्पादन घेऊन सेंद्रिय शेती फायदेशीर असल्याचे स्पष्ट केले आहे. सेंद्रिय शेती पद्धतीतून जास्त उत्पादन घेता येत नाही, हा समज त्यांनी खोडून काढला आहे. त्यांनी केलेला सेंद्रिय शेतीचा अवलंब इतर शेतकऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
साखरखेर्डा परिसरात खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, मका, संकरित ज्वारी ही पिके घेतली जातात. यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मातेरे झाले. कापसाच्या वाती झाल्या, मूग सडला, अशा परिस्थितीत खचून न जाता शेतकऱ्यांनी रब्बी पेरणीकरिता कंबर कसली. मागील शासनाच्या काळात या भागात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सिंचनाची अनेक कामे झाली. जमिनीत जलसाठा वाढला. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. विहिरीच्या पाण्याची पातळी वाढली. सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्याने गहू, हरभरा या पिकांचे नियोजन शेतकऱ्यांनी केले. साखरखेर्डा येथील कुवरसिंग मोहने हे पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे संचालक म्हणून काम पाहतात. जैविक शेती मिशनचा लाभ शेतकऱ्यांना कसा घेता येईल, यासाठी त्यांनी साखरखेर्डा येथे कार्यशाळा आयोजित केली होती. त्यामध्ये शेकडो शेतकऱ्यांनी भाग घेतला होता. ज्यांना जैविक शेतीचे नियोजन कळले त्यांनी त्या पद्धतीने शेती केली आणि पहिल्याच प्रयोगात यशही मिळाले.
साखरखेर्डा येथील हरीश सुधाकर देशपांडे यांनी आठ एकर शेतात सोयाबीननंतर गहू घेण्यासाठी शेतीची मशागत केली.
येथील हरीश देशपांडे यांनी पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनच्या माध्यमातून आठ एकरात गव्हाची पेरणी केली. रासायनिक खतांचा एकही मात्रा न वापरता शेणखत, जिवामृत यांचा वापर करून पेरणी केली. गव्हाची वाढही चार फुटांपेक्षा जास्त झाली. ९ नोव्हेंबर रोजी पेरणी केल्यानंतर चार वेळा पाणी, निंदन असा एकरी तीन हजार रुपये खर्च त्यांना आला. बन्सी जातीचा गहू असल्याने आणि सेंद्रिय खतांचा वापर केल्याने या गव्हाची मागणी जास्त असते. आज ४० ते ४५ रुपये किलो दराने व्यापारी खरेदी करून पुणे, मुंबई येथे विक्रीसाठी पाठवितात. आज एकरी १२ क्विंटल उत्पादन घेऊन ४ हजार ५०० प्रति क्विंटल भाव मिळाल्याने त्यांना ८ एकरात ४ लाख ३२ हजारांचे उत्पादन मिळाले आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती मिशनच्या माध्यमातून शेती किती फायद्याची आहे हे लक्षात येते.
सेंद्रिय खत आणि १२ वनस्पतींपासून बनविलेल्या कीटकनाशकाची फवारणी केली तर कोणतेही कीटक त्या पिकावर आक्रमण करू शकत नाही. या गव्हाची पोळी आरोग्याला पोषक असते. संपूर्ण नैसर्गिक वातावरण असल्याने जमिनीचा पोतही सुधारतो.
-समाधान वाघ,
कृषी सहायक, साखरखेर्डा.
पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनच्या माध्यमातून मी शेती केली. त्याचा फायदा मला झाला. हीच पद्धत इतर शेतकऱ्यांनी राबविली तर शेतकरी समृद्ध होईल.
-हरीश सुधाकर देशपांडे,
आदर्श शेतकरी, साखरखेर्डा.
फोटो : हरीश सुधाकर देशपांडे यांनी पेरलेला गहू.