भाऊसाहेब फुंडकर यांच्या घरासमोर शेतक-यासह भाजप प्रेमींची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 02:13 PM2018-05-31T14:13:54+5:302018-05-31T14:13:54+5:30
महाराष्ट्राचे कृषी व फलोत्पादनमंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनाची वार्ता कळताच शेतक-यांसह भाजप प्रेमींनी गुरुवारी खामगाव शहरातील ‘वसुंधरा’ बंगल्यासमोर गर्दी केली होती.
बुलडाणा - महाराष्ट्राचे कृषी व फलोत्पादनमंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनाची वार्ता कळताच शेतक-यांसह भाजप प्रेमींनी गुरुवारी, ३१ मे रोजी शहरातील ‘वसुंधरा’ बंगल्यासमोर गर्दी केली होती.
कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे जे. जे. सोमय्या रुग्णालयात निधन झालं. रात्री एक वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमय्या रुग्णालयात भाऊसाहेबांना भरती करण्यात आले होते. रात्री साडे बारा ते एकच्या सुमारास त्यांना हृदय विकाराचा झटका आला. हृदयविकाराचा झटका तीव्र असल्यानं त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूची वार्ता खामगाव येथे कळताच भाजप नगरसेवकासह, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह ग्रामिण विविध सेलचे कार्यकर्ते यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कुटूंबियांची भेट घेतली.
उद्या अंत्ययात्रा
ना. भाऊसाहेब फुंडकर यांची अंत्ययात्रा शुक्रवारी, १ जूनरोजी खामगाव येथे त्यांच्या निवासस्थानावरुन निघणार आहे. भाजप कार्यालय, गांधी बगीचा, कमाणी गेट, एकबोटे चौक, भगतसिंग चौक, फरशी, मेनरोड, टिळक पुतळा, चांदमारी, शेगांव नाका, शेगांव रोडने मार्गक्रमण करीत सिध्दीविनायक टेक्नीकल कॅम्पसच्या प्रांगणामध्ये सकाळी ११ वाजता त्यांच्या पार्थीवावर अंतिम संस्कार करण्यात येतील, असे भारतीय जनता पार्टी खामगावच्या वतीने कळविण्यात आले आहे.