शेतकरी व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांनाही मिळणार रेशनची साखर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 11:43 AM2020-11-13T11:43:58+5:302020-11-13T11:44:12+5:30
Buldhana News प्रति कुटुंब एक किलो साखर २० रुपये दराने वितरीत करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दिवाळी सणानिमित्त प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असल्यामुळे एपीएल अंतर्गत शेतकरी लाभार्थी शिधापत्रिकाधारक कुटुंबाना प्रति कुटुंब एक किलो साखर २० रुपये दराने वितरीत करण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात त्यानुषंगाने ४,२२६ क्विंटर साखर वितरीत करावी लागणार आहे. परिणामी या लाभार्थ्यांचीही दिवाळी गोड होणार आहे.
अन्न व नागरी पुरवठा विभागाने नऊ नोव्हेंबर रोजी अनुषंगीक निर्णय घेतला आहे. त्यानुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातील प्राधान्य कुटुंब, एपीएल शेतकरी आणि अंत्योदय लाभार्थी शिधापत्रिकाधारक असलेल्या ४ लाक ८२ हजार ९६२ कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. साधारणत: अंत्योदय लाभार्थ्यांना साखर दिल्या जात होती. मात्र कोरोना संसर्ग व तत्सम बाबी पाहता यावेळी अन्न व नागरी पुरवठा विभागाने प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी व राज्यातील १४ जिल्ह्यातील एपीएल शेतकरी लाभार्थी शिधापत्रिकाधराक कुटुंबांना प्रती कुटुंब एक किलो प्रमाणे साखर वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी २० रुपये दर ठेवण्यात आला आहे. बुलडाणा जिल्ह्यात प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यातंर्गत ३ लाख ५७ हजार, ४५२ कार्डधारक असून त्यामध्ये १५ लाख १९ हजार २१५ लोकसंख्या येते तर एपीएल शेतकरी लाभार्थ्यांमध्ये ८५ हजार २०५ कार्डधारक असून त्यांच्या कुटुंबातील एकूण सदस्यांची संख्या ३ लाख ७७ हजार ३१४ येते.
अंत्योदय अंतर्गत तर पुर्वीवापसूनच साखर वाटप करण्यात येते. त्याचे ६४ हजार ८१० कार्डधारक असून ३ लाख २ हजार ८२९ लोकसंख्या त्यातंर्गत अंतर्भूत आहे. दरम्यान नऊ नोव्हेंबर रोजीच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भाने प्थमत: संबंधित जिल्ह्यांसाठी पुरवठादाराकंडून साखरेचा करार करावा लागणार आहे. त्याची प्रक्रिया पुरवठा विभागाने सध्या युद्धपातळीवर सुरू केली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष दीपोत्सवादरम्यान लाभार्थ्यांना येत्या आठवड्यात ही साखर प्रत्यक्ष हाती पडण्याची शक्यता कमी आहे. मात्र पुरवठा विभाग त्यादृष्टीने प्रयत्न करीत असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश बेल्हाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.