‘पीएम किसान’च्या लाभापासून शेतकरी वंचित
By विवेक चांदुरकर | Published: June 20, 2024 06:34 PM2024-06-20T18:34:43+5:302024-06-20T18:35:04+5:30
पीएम किसान योजनेचा हप्ता काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. मात्र सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही असंख्य शेतकरी अद्यापही या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत.
लोणवाडी : ‘पीएम किसान’ च्या हप्त्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी कार्यालयात २० जून रोजी तहसील कार्यालयात धडक दिली. शेतकरी आक्रमक झाल्यामुळे यावेळी पोलिसांना पाचारण करावे लागले.
पीएम किसान योजनेचा हप्ता काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. मात्र सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही असंख्य शेतकरी अद्यापही या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. वंचित असलेले शेतकरी योजनेच्या कार्यालयात वारंवार चकरा मारून संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करीत आहे. तरीही अनेक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा निधी मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे. संबंधित कार्यालयाकडून वंचित शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तरे मिळत नसून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहे. अनेकदा शेतकऱ्यांचा अपमान करून त्यांना हाकलून देण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांचा आक्रोश वाढत आहे. संबंधित विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पीएम किसान योजनेच्या निधीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा व योग्य मार्गदर्शन करावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे. अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.